जतच्या वाळू लुटीत कोन कोन सामील | दिवसाढवळ्या वाळू तस्करी ; अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट,हाताची घडी
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून शासनाला दररोज लाखो रुपयांच्या महसुलाचा गंडा घातला जात आहे. या काळ्या सोन्याच्या लुटीतून वाळू तस्कर शासनाला कोट्यवधींचा चुना लावून घरावर सोन्याची कौले चढविताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील वाळू उपशाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वाळू तस्करी हा एक नवीनच काळा धंदा सुरू झाला आहे.
वाळू तस्करीमध्ये इतका अफाट पैसा आहे की या माध्यमातून तालुक्यात अनेक गावगुंड,नेत्यांच्या मागेपुढे करणारे रंकाचे राव झाले आहेत. कालपर्यंत ज्यांच्या पायात चपलेचा थांगपत्ता नव्हता अशी मंडळी आता वातानुकुलीत चारचाकीतून फिरताना दिसत आहेत. वाळू तस्करी ही तालुक्यातील काही ठराविक लोकांची मक्तेदारी होवून बसली आहे. परिघाबाहेचा कुणी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच साम, दाम, दंड, भेद वापरून त्याला हाकलून लावले जाते.
वाळू तस्करीची केंद्रस्थाने
जत तालुक्यात पुर्व भागातील बोर नदी पात्रातील संख,सुसलाद,सोनलगी,हळ्ळी,शेगाव परिसरातील सिंगनहळी,कासलिंगवाडी परिसरातील नदीपात्र,डफळापूर सह परिसरातील ओढे,तलाव अशी काही ठिकाणे आजकाल वाळू तस्करीची केंद्रस्थाने झालेली आहेत.

दाम-दसपट लूट !
जत तालुक्यात इतकी वाळूची लुट होत असताना महसूलची यंत्रणा मुग गिळून गप्प का आहे.याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे.वाळू तस्करीसाठी महसूलच्या अधिकाऱ्यांनी काही खाजगी दलाल नेमत वाळूची मोठ्या प्रमाणात लुट केली जात असल्याचे चर्चा सुरू आहे. नेत्याच्या बरोबर फोटो काढणारे काही दलाल पोलीस,महसूलच्या अधिकाऱ्यांवर वाळूच्या गाड्या पकडू नयेत यासाठी दबाव टाकत असल्याचे समजते.
