इंटरनेटचे व्यसन; एक घातक समस्या

0



अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे आपण सर्वांनीच शाळेत शिकलो आहोत. सध्याच्या काळात त्यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे इंटरनेटची. विशेषतः आजची तरुण पिढी अन्न, पाण्याशिवाय जगेल पण इंटरनेट शिवाय नाही अशी आजची अवस्था आहे. आजची तरुण पिढी इंटरनेटच्या इतकी आहारी गेली आहे की इंटरनेट शिवाय ते जगूच शकत नाही. 






कोरोना साथीच्या काळात तर इंटरनेटही जीवनावश्यक गरज बनली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने  कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्ट फोनची स्क्रीन हेच फळा, पुस्तक बनले आहे. घरातल्या खोल्या शाळेचे वर्ग बनले आहेत. मुले तासंतास मोबाईल मध्ये नाक खुपसून बसलेले असतात. उद्याने, मैदाने बंद असल्याने पालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पालकांकडेही  मुलांशी बोलण्यासाठी वेळ नसल्याने पालक आणि पाल्यांचा संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप ही संवादाची साधने बनली आहेत. मुले वास्तवतेपेक्षा आभासी दुनियेत जगत आहेत. मुले  डिजिटल माध्यमांचा इतका वापर करत आहेत की जणू त्यांना इंटरनेटचे व्यसन लागले आहे. सतत इंटरनेटवर असणे, त्यावरील गेम्स खेळणे, यु ट्यूब, वेबसिरीज, वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स, पॉर्न साईट पाहणे हे अनेक मुले नको त्या वयात करत आहेत.







Rate Card

 त्यावर पालकांचे कुठलेही नियंत्रण नाही. आपला मुलगा इंटरनेटवर काय पाहत आहे. कोणाशी बोलत आहे, कोणते गेम खेळत आहे हे देखील पालक पाहत नाही. त्यामुळे मुले इंटरनेटच्या महाजालात अडकत चालले आहेत. पालकांनी मुलांना मोबाईल देऊ नये,मुलांच्या  इंटरनेट वापरावर बंदी घालावी असे कोणीही म्हणणार नाही आजच्या युगाशी ते सुसंगतही नाही. पण पालकांनी मुलांच्या इंटरनेट वापरावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिवापर घातक असतो. इंटरनेटचा अतिवापर देखील घातकच आहे. जे मुले इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात त्यांना पुढे जाऊन नैराश्य येते असे एका सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुले आभासी दुनियेतच जास्त रमतात. इंटरनेट वापरताना एकाच जागी बसून राहिल्याने मुलांची  शारीरिक हालचाल होत नाही. 







परिणामी स्थूलता वाढते. स्थूलता वाढल्याने अनेक आजार होतात. सतत मोबाईल समोर असल्याने डोळे दुखतात. दृष्टी कमी होते.6 ते 18 वयोगटातील 26 टक्के मुलांना दृष्टीदोष असल्याचे नुकतेच एका पाहणीत आढळून आले आहे. इंटरनेटमुळे मुले शारीरिक व मानसिकरित्या पंगू बनत आहेत म्हणूनच इंटरनेटच्या वापरावर मर्यादा घातली पाहिजे. पालकांनी याबाबतीत अधिक दक्ष राहिले पाहिजे. 


श्याम बसप्पा ठाणेदार 

दौंड जिल्हा पुणे

9922546295

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.