दो गज की दूरी, है बहोत जरुरी’

0



स्वयंशासित समाज ही देशाची फार मोठी संपत्ती असते. जो शिस्तबद्ध आहे, तो सामाजिक जीवनात सर्व मर्यादांचे पालन करतो. आणि याच स्वयंशासित समाजामुळे राष्ट्र उभे राहते. खरे तर देशाला सर्वकाळात शिस्तबद्ध नागरिकांची गरज असते. कारण शत्रूआक्रमण, अपघात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती तसेच जैविक आपत्ती कधीही येऊ शकते. याशिवाय दररोजच्या जीवनातही शिस्तीचे पालन अनेक कामात सुलभता प्रदान करते. शिस्तीमुळे वैयक्तिक जीवन घडते. चारित्र्याचे संवर्धन होते. तसे पाहिले तर या शिस्तवान नागरिकांमुळेच स्वयंशासित समाज घडतो. आता आपल्याला पुन्हा या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे लागत आहे. कारण कोरोना हे एक जीवघेणे संकट आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे.  कोरोनाविरुद्धची लढाई एकट्याने आणि सर्वांनीही लढायची आहे. लढाई म्हटली की आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की, ही नेहमी नियोजनपूर्वक, शिस्तबद्ध मोर्चेबांधणी करून लढायची असते. 






कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर, योगा ही सर्व युद्धाची आयुधे आहेत. यांचे पालन म्हणजेच शिस्त अंगिकारणे होय. कोरोनाविरुद्धचे युद्ध हे केवळ शिस्तबद्धपद्धतीने लढण्यातच आपल्या सर्वांचे हित आहे. कारण कोरोना हा अदृश्य खतरनाक शत्रू आहे. लॉकडाऊनवरून आपण आता अनलॉककडे आलो आहे.कारण आता त्याशिवाय गत्यंतर नाही, हे आपल्याला कळले आहे, पण त्याचे  दुष्परिणामही दिल्ली आणि मुंबईसह सर्वत्र पाहायला मिळत आहेत.आहेत. कोरोनाविरुद्धचा संघर्ष दीर्घकाळ चालणार आहे. 



Rate Card






त्याचा मुकाबला करायचा म्हणजे खडतर रोगप्रतिकारशक्ती विकसित करावी लागेल. त्यासाठी व्यायाम, योगा, चौरस आहार या गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागेल. ते अंगिकारावे लागेल. कुटूंबालासुद्धा याचा परिपाठ द्यावा लागेल. सोबत वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता हाही महत्वाचा भाग आहे. कोरोना थुंकी, शिंक, खोकला, अलिंगन, हस्तांदोलन याद्वारे पसरतो, हे आपण जाणतो. त्यामुळे मास्क आणि रुमाल वापरणे. सर्व प्रकारचा स्पर्श टाळणे. सॅनिटायझर आणि साबणाचा यथायोग्य वापर करणे हे सर्व करावे लागेल. आपण जर गैरशिस्तीने वागलो, संकटाचे गांभिर्य न जोखले तर काळ आपल्याला माफ करणार नाही. त्याची फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल. आपले व्यावहारिक आणि सामाजिक जीवन एकमेकांवर अवलंबित आहे. जो शिस्तीचे पालन करणार नाही, स्वच्छतेचा, आरोग्याचा आग्रह धरणार नाही तो समाजशत्रू ठरणार आहे.


मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.