तासगाव तालुक्यात दोन दिवसात तिघांचा मृत्यू | मृतांचा आकडा 5 वर : रुग्णसंख्या शतकाकडे : 33 रुग्ण बरे
तासगाव : तासगाव तालुक्याभोवती कोरोनाची मगरमिठी घट्ट होत चालली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा शतकाकडे वाटचाल करीत आहे. आतापर्यंत तालुक्यात 93 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील 33 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 55 जण अद्याप उपचार घेत आहेत. गेल्या दोन दिवसात तालुक्यात 3 रुग्णांवर कोरोनाने घाला घातला आहे. तालुक्यातील कोरोनाने मृत झालेल्यांची संख्या 5 वर पोहोचली आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती. सुरुवातीचे 25 रुग्ण उपचारानंतर बरे झाले होते. त्यावेळी तालुका ‘कोरोनामुक्त’ झाला होता. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.तालुक्यातील 93 जण आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातील 33 जणांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर 55 जण आजही कोरोनाशी झुंज देत आहेत. आतापर्यंत 5 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
