विषारी दारूचे बळी

0

    

पंजाबमध्ये विषारी दारु पिल्याने 90 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. विषारी दारूने मृत्यूकांड होण्याची ही देशातील पहिलीच घटना नाही याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत पण त्यातून कोणताही धडा न घेतल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या दुर्दैवी घटनेची  चौकशी करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली. त्यासाठी एस आय टी नेमून या घटनेची चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. अर्थात मुख्यमंत्र्यांनी एस आय टी ची घोषणा करणे यात काही विशेष नाही.  एखादी दुर्दैवी घटना घडली की त्यासाठी चौकशी आयोग नेमणे ही आपल्या देशात नित्याची बाब आहे. पण त्या चौकशी आयोगाचे पुढे काय होते? त्यातून दोषींना शिक्षा होते का ? शिक्षा झाली तर मग अशा घटनांची पुनरावृत्ती का होते? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. 

मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी सरकार काय प्रयत्न करते हे महत्वाचे आहे. विषारी दारू उत्पादित करुन  ती विकली जात असताना सरकार आणि आणि पोलीस यंत्रणा नेमके काय करत होती हा खरा प्रश्न आहे. दारूची निर्मिती करणारे दारूमध्ये अल्कोहोल, धतुरा आणि युरिया यांचे मिश्रण टाकत होते ही दारू बनवण्यासाठी नवसागर आणि मिथाईल अल्कोहोल यासारख्या  रासायनिक पदार्थांचा देखील वापर केला जातो अशी माहिती समोर  आली आहे. हे सर्व पदार्थ मानवी शरीरासाठी हानिकारक आहे हे माहीत असतानाही त्याचा दारुसाठी सर्रास वापर केला जातो. आपल्या देशात विनापरवाना दारू विक्री करणे हा गुन्हा असताना गाव खेड्यातच नव्हे तर शहरात देखील अवैध दारूच्या भट्ट्या जागोजागी दिसतात. या भट्ट्यांमध्ये अवैध पद्धतीने विषारी दारूची निर्मिती केली जाते. हे पोलिसांसह प्रशासनाला देखील माहीत असते पण या दारू माफियांनी पोलिसांचे व प्रशासनाचे हात आधीच  ओले केले असल्याने ते त्याकडे कानाडोळा करतात त्याचा परिणाम म्हणून अशा दुर्दैवी घटना घडतात.

 एखादी घटना घडली किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा असला तरच कारवाईचे नाटक केले जाते आणि काही दिवसांनी पुनश्च हरिओम होतो. दारू माफिया व पोलीस प्रशासनातील  भ्रष्ट अधिकारी यांच्या  अभद्र युतीमुळेच अशा दुर्दैवी घटना घडतात. जोवर ही अभद्र युती तुटत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर या घटना थांबेल असे वाटत नाही. या घटनेची देशभर चर्चा झाल्याने  पोलिसांवरील दबाव वाढला त्यामुळे पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे परंतु दारू निर्मितीवर मात्र कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाही. दारूच्या आहारी गेलेले लोक दारू मिळाली नाही तर जी दारू मिळेल ती पितात. आपण जी दारु पितो तिच्यामुळे आपला जीवही जाऊ शकतो याचेही भान त्यांना नसते. दारू माफियांवर कारवाई करण्यासोबतच दारूच्या आहारी गेलेल्या लोकांचे समुपदेशन करुन त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी देखील शासन स्तरावरून  प्रयत्न व्हावेत.  

 श्याम बसप्पा ठाणेदार

 दौंड जिल्हा पुणे 

9922546295 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.