गावातले लोक गावात काही कामधंदा नाही म्हणून शहरात गेले. अपार कष्ट उपसले. हे करताना उपाशी राहिले, उघड्यावर झोपले. तरीही त्यांना शहर आपलेच वाटले. त्यामुळे त्यांनी गावाकडे पाठ फिरवली. काहींनी गावाकडचा जमीन-जुमला विकला. पण कोरोना संसर्गाचे संकट आले तेव्हा, याच शहराने त्यांना वाऱ्यावर सोडले. मग मात्र त्यांना गावाकडची आठवण झाली. ज्यांनी गावाशी नाळ जोडून ठेवली होती, त्यांनी गाव जवळ केले. बाकीच्यांचे हाल झाले. काही बेघर झालेलेदेखील गावाकडे आली. मंदिरात ,झाडाखाली राहिली. त्यांना गावाने जवळ केला. पण या लोकांना शहराने काय दिले? अपमान, अविश्वास, भूक, दारिद्र्य आणि कोरोना दिला. गावे सुरक्षित होती. पण शहरांनी व्यापारी, बाजारी, नफेखोरी, लालची, स्वार्थी शहरी लोकांनी हे संकट लादले. त्यामुळे गाव हा आपला धर्म, धन, कर्तव्य मानून ते लोक गावात परत आले.
मात्र काही गावात त्यांना नाकारण्याचा कटू अनुभवही आला. काहींना आपली चूक लक्षात आली. कोरोनाने माणुसकीच घालवण्याचा विढा उचलला होता, पण शेवटी गावाने त्यांना स्वीकारले.
आता गावातून उठाव व्हायला हवा. कोरोनाच्या काळात सगळे धंदे आयुष्यातून उठले. पण शेती आणि शेतीसंबंधी छोटे-मोठे उद्योग टिकून राहिले. आपल्यातील शेती समृद्ध आहे, म्हणून या महामारीच्या काळात माणसं तगली. त्यामुळे आता गावाकडं आलेल्या माणसांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी पेटून उठायला हवं. आमच्या लोकांना बेसहारा, बेवारस म्हणून शहरातून हाकलले ना, आता आमचं आम्ही बघू, त्यांचं काय करायचं ते आमचं आम्ही बघू, असा निर्धार आता गावकऱ्यांनी केला पाहिजे.
गावातला माणूस गावातच जगला पाहिजे,गावे समृद्ध झाली पाहिजेत अशी व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. आता सरकारलाही कळून चुकले आहे की, उद्योगधंदेसुद्धा ग्रामीण भागात उभारले पाहिजेत. त्यासाठी सरकारने तयारी केली पाहिजे. गावातच रोजगार मिळण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत.ग्रामीण अर्थव्यवस्था, नैसर्गिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भक्कम कशी होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. आर्थिकदृष्ट्या गावे भक्कम झाली तर शहरालाही अधिक ताण बसणार नाही आणि ते बिनधास्त राहील. काही गावांना आपल्या क्षमतेची, गौरवाची, स्वाभिमानाची जाणीव करून द्यावी लागणार आहे. या पद्धतीनेच शैक्षणिक धोरण राबवले पाहिजे. रोजगार, आरोग्य यांचा दर्जा वाढवला पाहिजे.
किमान, मंदिरे उभारण्यापेक्षा शाळा-महाविद्यालये,दवाखाने भक्कम केली पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावे रोजगारात स्वयंपूर्ण व्हायला हवीत, याकडे सरकारपासून गावपातळीपर्यंतच्या सर्वच स्तरातील लोकांनी लक्ष दिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही, त्यामुळे आता डोळे उघडलेच आहेत. आता स्वस्थ बसू चालणार नाही.
सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण दूर व्हायला हवा. नवीन उद्योग गावात उभारले पाहिजेत. उद्योग विकास झाला पाहिजे. ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही. गरिबी, भूकबळीसारखे प्रश्न आ वासले आहेत. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागात जागेचा प्रश्न नाही. उद्योगांना भरपूर जागा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या गेल्या तर नक्कीच या भागाचा शाश्वत विकास होईल. आणि शहराकडे जाणारा लोंढा कमी होईल. आज शहरांची अवस्था बिकट आहे. रोजगारासाठी धावणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे शहरात सुविधांच्या समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. लोकांच्या गर्दीपुढे तिथली सुविधा पुरवणारी यंत्रणा हतबल झाली आहे.
देशात नव्याने सुरू होणारे उद्योग ग्रामीण भागात सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.मुळात उद्योगांना लागणारा कच्चा माल आदिवासी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावर आधारित उद्योग या भागात सुरू करता येण्यासारखे आहे.
याशिवाय नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान या भागात पोहचून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी इथल्या तरुणांना उपलब्ध होईल. यासाठी उद्योगांचे विकेंद्रीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्याची आवश्यकता असून त्याशिवाय नेमक्या दिशेने वाटचाल सुरू होणार नाही.कोरोना संसर्ग आवरण्याला अजून उपाय सापडला नाही. म्हणजे प्रतिबंधात्मक लस आल्याशिवाय जनजीवन सर्वसामान्य होणार नाही. त्यामुळे त्याच्यासोबत जगण्याची कला विकसित केली पाहिजे. मात्र ही महामारी एकदा हटली म्हणजे, पुन्हा या गोष्टीकडे लक्ष द्यायचे नाही, असा अर्थ आता कुणीच घेऊ नये. कारण इथून पुढच्या काळात अशा कित्येक महामाऱ्या माणसाच्या जीवावर उठायला उद्भवणाऱ्या आहेत. माणसाचे राहणीमानच याला कारणीभूत आहे. शहरातील गर्दी, सर्व प्रकारचे प्रदूषण, अपघात, बदललेली जीवनशैली यामुळे माणसाचे आयुष्य आज औषध गोळ्यांवर अवलंबून राहिले. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीपुढे जीवन टिकणार नाही. याचा गांभीर्याने विचार सर्व स्तरावर झाला पाहिजे.
मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012