आजपासून लॉकडाऊनचे हे आहेत नियम

0

सांगली : सांगली जिल्ह्यात नागरी भागात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जाहीर केलेले आहे. तसेच राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासन निर्देशानुसार दि. 01 ऑगस्ट 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत.

सांगली जिल्ह्याच्या सीमा, बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील. या कालावधीत आंतरराज्य व आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा / सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतूक वगळून उर्वरित सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल. आंतरराज्य व आंतरजिल्हा व्यक्तीच्या प्रवासावर प्रतिबंध असेल व असा प्रवास मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियंत्रित केला जाईल. सदर कालावधीत 21.00 वाजलेपासून ते 05.00 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधित असतील. 

चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस (Entertainment), प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित असतील. सर्व सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील. धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणाची उपासनास्थळे प्रतिबंधित असतील. तसेच खाजगी व सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सर्व नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यास प्रतिबंध असेल. हॉटेल्स, रेस्टोरंट, आणि इतर आदरातिथ्य सेवा प्रतिबंधित असतील. हॉटेल्स, रेस्टोरंट व किचन येथून पार्सल देणे व घरपोच सेवा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल. तसेच निवासी व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाउस या आस्थापना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि.७ जुलै २०२० च्या आदेशानुसार सुरु राहतील. 

जिल्ह्यातील वय वर्षे 65 वरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालील बालके व आजार असणाऱ्या व्यक्ती ( Persons with co-morbidities ) यांना अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. 

सदर कालावधीत अंत्यविधीकरिता 20 व लग्नसमारंभ करिता 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी Social Distancing पाळणे बंधनकारक राहणार आहे. तसेच लग्नसमारंभ विषयक बाबी लॉन / विना वातानुकुलीत – मंगल कार्यालय/ हॉल / सभागृह मध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 23 जून 2020 च्या आदेशातील अटी व शर्तींचे अधीन राहून करण्यास परवानगी असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने (medical shops) वगळून सर्व मार्केट व दुकाने 09.00 वाजे पूर्वी व 19.00 वाजले नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.

Rate Card

सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, सुपारी खाणे व थुंकणे प्रतिबंधित असेल. तसेच पानपट्टी मधून पान, तंबाखू, सुपारी व तत्सम पदार्थ फक्त पार्सल स्वरूपात देण्यात यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेस या  500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असेल. तसेच सदर बाबीचे उल्लंघन केल्यास 500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone ) या क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

क्रीडा संकुले किंवा स्टेडीयमच्या आतील क्षेत्र (बंदिस्त) (indoor) याचा वापर प्रतिबंधित असेल. शासन आदेशानुसार वेळोवेळी शिथिलता देण्यात आलेल्या बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रामध्ये खालील अटीच्या आधारे सुरु असण्यास परवानगी असेल.

परवानगी असलेल्या बाबीना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नाही. क्रीडा संकुले आणि मैदाने यांच्या बाह्य जागा आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक जमणेस व समूह सराव किंवा एकत्रित खेळ खेळण्यास प्रतिबंध करणेत येत आहे. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार सामाजिक अंतराचे निकष पाळून करणेस हरकत नाही. खुल्या मैदानामध्ये गोल्फ कोर्सेस, जिमनॅस्टिक, टेनिस, खुल्या मैदानातील बॅडमिंटन आणि मल्लखांब यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून दि. 05 ऑगस्ट 2020 रोजी पासून करणेस परवानगी असेल. केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. ३० जून 2020 च्या आदेशानुसार परवानगी असेल. यापूर्वीच्या आदेशाने सुरु करणेत आलेले सर्व उद्योगधंदे व बांधकामे या पुढेही सुरु राहतील.

जिल्हा अंतर्गत (Intra District) सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना खालील प्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतूक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराचे वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवासी व चालक / वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांचे वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे मास्क न घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही.  दुचाकी – 1 + 1 हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक असेल, तीन चाकी – 1 + 2 व  चार चाकी – 1 + 3.

जिल्हा अंतर्गत बस सेवा हि जास्तीत जास्त 50 टक्के प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनेसह सुरु करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याच प्रमाणे मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.

मॉल्स दि. 05 ऑगस्ट 2020 पासून 09.00 वाजले पासून ते 19.00 वाजे पर्यंत सुरु राहतील. तथापि मॉल्स मधील सिनेमागृहे, खाद्यगृहे / रेस्टोरंट पूर्णपणे बंद राहतील. परंतु मॉल्स मधील अन्नगृहे / रेस्टोरंट ची स्वयंपाकगृहे सुरु ठेवून पार्सल सुविधा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल.

वरील नमूद प्रतिबंधित बाबी वगळता उर्वरित सर्व बाबीना मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय यांचेकडील निर्देशानुसार प्रतिबंध व सुट लागू असेल.  

या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करणेकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.