जत तालुक्यातील निकृष्ठ रस्ते कामाच्या निषेधार्थ रास्तारोको | भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
जत,प्रतिनिधी : जत ते उमदी, घोलेश्वर फाटा ते माडग्याळ -अंकलगी,खैराव ते निगडी,सनमडी ते कोळगिरी या रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे चालू असून अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे असा प्रकार राजरोसपणे होत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी केला.या रस्ते कामांची व संबधित बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी,या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील
जत ते उमदी, घोलेश्वर फाटा ते माडग्याळ -अंकलगी,खैराव ते निगडी,सनमडी ते कोळगिरी या प्रमुख रस्त्यासह अनेक रस्त्याची लॉकडाऊन नंतर गतीने कामे सुरू आहेत.अगदी भर पावसातही डांबरीकरण करण्याचे प्रताप बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू आहेत.जतच्या बाधकांम विभागाचे दोन्ही विभागाचे अधिकारी,अभियंते,कंत्राटदार यांच्यात पैैैेेेसे मिळविण्यासाठी समन्वय ठरलेला असून शासनाच्या कोट्यावधीचा निधी फस्त करून लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार जत तालुक्यात होत आहे.

तालुक्यात अगदी काही महिन्यात केले रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहे.अनेक रस्त्यावरील डांबराचे अवशेष एकाच पावसात वाहून गेल्याचे प्रकार हे अधिकाऱ्यांच्या गुळगुळीत धोरणाचे प्रताप आहेत.एकीकडे टक्केवारीतून अधिकारी,ठेकेदार गबरगंड होत आहेत,तर दुसरीकडे रस्त्यावरील या खड्ड्यामुळे जनतेच्या शरीराची वाट लावली जात आहे.
तालुक्यातील प्रत्येक रस्ते कामात अत्यल्प डांबराचा टॅककोट,एमपीएमचे थर व ऑईलमिश्रित डांबर वापरून कामे केली जात आहेत.जत-उमदी रस्त्यावरील कामावरून अधिकाऱ्यांच्या संगणमताचा भांडाफोड पवार यांनी केला आहे.आमदार विक्रमसिंह सावंत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अधिकारी अजयकुमार ठोंबरे यांना फोनवरून सांगूनही या कामाच्या दर्जामध्ये कसलीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे पवार यांनी जत ते उमदी, घोलेश्वर फाटा ते माडग्याळ -अंकलगी,खैराव ते निगडी व सनमडी ते कोळगिरी या रस्त्याच्या निकृष्ठ कामाच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी नगरसेवक उमेश सावंत,भाजपचे जत शहर अध्यक्ष आण्णा भिसे,खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष गैतम ऐवळे उपस्थित होते.