उमदी,वार्ताहर : महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यावर चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुसलाद येथील शेतकरी अमशिद्धा बिराजदार व परशुराम टेंगले यांनी एका निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांचेकडे केला आहे.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस प्रमुख, पालकमंत्री व महसूल मंत्री यांंना पाठविण्यात आली आहे.
जत तालुक्याच्या पूर्व भागामधील बोर नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे काम महसूल व पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र जे लोक यात नाहीत.त्यांच्या घरासमोरील वाहनांंवर कारवाई केली जात आहे.आकसापोटी व कुणाच्यातरी सांगण्यावरुन खोट्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत.सध्या याठिकाणी चोर सोडून संन्याशाला कायद्याच्या जाळ्यात अडकविले जात आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे. दि.18 जुलै रोजी आमसिद्धा बिराजदार यांच्या घरासमोर लावलेला ट्रॅक्टर (इंजिन) महसूलच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून नेला. ट्रेलर नसताना सुद्धा कारवाई केली. अशा पद्धतीने खोट्या कारवाया करण्याचे काम महसूल व पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने महसूल प्रशासनातील व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे.
आम्ही शेतकरी कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलेले आहेत. कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना हे ट्रॅक्टर कराराने साखर कारखान्याला दिले आहेत. कारखान्याकडून ऊस वाहतूक करून कसेबसे कर्जाचे हप्ते भरले जात आहेत. महसूल अधिकाऱ्याकडून ट्रॅक्टर वाळू साठीच असल्याचे सांगत इंजिनवरही खोटी कारवाई करण्यात आली आहे. अशा खोट्या कारवाईमुळे महसूल व पोलिस प्रशासन बदनाम होत आहे. तसेच बिराजदार यांंच्या ट्रॅक्टरची नोंद देखील पोलिसांत नाही ज्या ट्रॅक्टर चा चेसी नंबर नोंद केला आहे. तो ट्रॅक्टर वेगळाच आहे. याबाबत आम्ही पोलिसांकडे विचारणा केली असता तो ट्रॅक्टर घेऊन या मग तुमचा ट्रॅक्टर घेऊन जावा अशी उत्तरे दिली जातात. प्रशासनाकडून अन्याय होत असून याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. परशुराम टेंगले हा शेतकरी कारखान्यात मुकादम आहे. त्याचा ट्रॅक्टर कारखान्याकडे कराराने दिला आहे. कारखान्याचे काम संपल्यानंतर शेती कामे करीत आहोत, तरीही घरासमोरील ट्रॅक्टरवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी करायचे काय ? महसूल व पोलीस प्रशासनाच्या खोट्या कारवाया त्वरित थांबाव्यात, अन्यथा जत येथील प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.