तासगाव : वीज वितरणाचा फॉल्ट असल्याने येथील स्मशानभूमीतील गॅस दाहीनी सुरू झाली नाही. परिणामी मृतदेह तासभर स्मशानभूमीतच ठेवण्यात आला. मात्र बरेच प्रयत्न करूनही लवकर फॉल्ट न सापडल्याने अखेर नातेवाईकांनी चिता रचून मृतदेहाला अग्नी दिला. या सगळ्या घोळात नातेवाईकांना मात्र मनस्ताप झाला.
या़बाबत माहिती अशी, शहरातील ढवळवेस येथील विलास जाधव हे सोमवारी सकाळी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन मागे येत असताना तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील स्मशानभूमीत नेण्यात येणार होते. तत्पूर्वी स्मशानभूमीतील गॅस दाहीनी सुरू आहे की नाही, याबाबत नातेवाईकांनी नगरपालिकेत चौकशी केली. पालिकेच्या कर्मचाऱ्याने ही गॅस दाहीनी सुरू करून टेस्ट घेतली.
त्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला. मात्र अचानक गॅस दाहीनी सुरू होईना. त्यानंतर सर्वांचीच पळापळ सुरू झाली. गॅस दाहिनीकडे जाणाऱ्या तीन फ्यूजपैकी दोन फ्यूजमध्येच वीज येत होती. त्यामुळे गॅस दाहीनी सुरू होत नव्हती.त्यानंतर महावितरणचे कर्मचारी, पालिकेचे कर्मचारी यांनी विजेचा झालेला फॉल्ट शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तासभर गेला. अखेर सातव्या पोलवर फॉल्ट सापडला. दरम्यानच्या वेळेत नातेवाईकांनी लाकडांची जुळणी करून चिता रचून मृतदेहाला अग्नी दिला. मात्र तासभर मृतदेह गॅस दाहीनी सुरू होईल, या आशेवर स्मशानभूमीतच ठेवण्यात आला होता. या सगळ्या गोंधळात नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला.
महावितरणच्या फॉल्टमुळे गॅस दाहीनी सुरू होण्यास अडचणी आल्या : प्रताप घाडगे
नगरपालिकेने सुमारे 62 लाख रुपये रुपयांचा निधी खर्चून गॅस दाहिणीचा प्रकल्प उभारला आहे. आज सकाळी संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा फोन आला. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्याने गॅस दाहीनी सुरू होते का, याची टेस्ट घेतली. त्यावेळी गॅस दाहीनी सुरू झाली. मात्र ज्यावेळी मृतदेह स्मशानभूमीत नेला त्यावेळी गॅस दाहीनी सुरू झाली नाही. नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे पाहिले असता वीज वितरणमध्ये फॉल्ट असल्याचे समजले. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी आले. त्यांनी फॉल्ट शोधून काढला. मात्र हा फॉल्ट सातव्या पोलवर सापडला. त्याला तासभर गेला. तोपर्यंत नातेवाईकांनी सबंधितांना चिता रचून दहन दिले, अशी माहिती नगरपालिकेचे प्रताप घाडगे यांनी दिली.