तासगांव : जगात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सावळजला (ता.तासगांव) कोरोनाचा पुन्हा धक्का बसला आहे. यापूर्वी ५ जुलै रोजी एकाच वेळी तीन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान आज (दि.१९) कोरोना बाधित सापडल्याने गाव “हाय ॲलर्ट” झाले आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात नियंत्रित असलेला सांगली जिल्हा कोरोनाच्या समुह संसर्गामुळे अडचणीत येत असल्याचे दिसत आहे. तासगांव तालुक्यात आत्तापर्यंत २६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. या सर्वाना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडले होते. गेल्या आठवड्यात तालुका कोरोनामुक्त झाल्याचा आनंद फारकाळ टिकूनराहीला नाही. दरम्यान आज सावळजमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने संबंधित रुग्ण वास्तव्यास असलेला भाग कटेंट्मेंट झोन केला आहे. तसेच गावातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश तहसिलदार कल्पना ढवळे,व गटविकास अधिकारी दिपा बापट यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल सुर्यवंशी,सावळज आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद भोसले,जि.प.सदस्य सागर पाटील, आशा सेविका, अतुलकुमार तायडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सावळज-अंजनी रस्त्यावरील भाजी विक्री बंद
सावळजमधील रस्त्याच्या बाजूला बसूनसुरु असलेल्या भाजीविक्री मुळे मोठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची कोणतीही काळजी नसणाऱ्या भाजीविक्रीबाबत तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित भाजीविक्री पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.