नीला सत्यनारायण | बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले
माजी आयएएस अधिकारी निला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन झाल्याची बातमी टेलिव्हिजन वर पाहिली आणि धक्का बसला कारण नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र केवळ कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच नव्हे तर कवियत्री, लेखिका, स्तंभलेखीका, संगीतकार, वक्त्या म्हणून ओळखतात.ज्या काळात मुलगी सातवी शिकली तरी खूप शिकली असे समजले जात होते त्याकाळात नीला सत्यनारायण या सनदी अधिकारी झाल्या.
नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या. नीला सत्यनारायण यांनी आपल्या 37 वर्षाच्या अधिकारीपदाच्या कारकिर्दीत महसूल, गृह, वन आणि पर्यावरण माहिती प्रसारण, समाजकल्याण, ग्रामविकास अशा महत्वाच्या खात्यात प्रमुख म्हणून काम पाहिले. प्रशासकीय सेवेत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. सनदी अधिकारी असूनही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली, वाढवली आणि लेखणीतून व्यक्त केली.त्यांनी 150 हुन अधिक कविता लिहिल्या. वृत्तपत्रात स्तंभलेखन केले. त्यांनी 35 कथा, कादंबरी लिहिल्या.

शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी काही मराठी चित्रपटासाठी व दोन हिंदी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून बाबांची शाळा हा मराठी चित्रपट निघाला त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले. तेजश्री प्रधान अभिनित जजमेंट हा मराठी चित्रपट त्यांच्याच ऋण या कादंबरीवरुन बननवण्यात आला आहे.2019 साली खऱ्याखुऱ्या गोष्टी हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. या कथासंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले. त्या उत्कृष्ट वक्तृत्वाच्या धनी होत्या. त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे पर्वणीच. त्यांना देश विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले आहे. नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 9922546295