जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बचत गटांना मायक्रोफायनान्स कंपनीकडून तगादा लावला जात असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी मायक्रोफायनान्स कंपनीचे अधिकारी व बचत गट महिलांशी चर्चा करून तात्काळ वसूली थांबण्याच्या सुचना दिल्या आहेत. जत मधील ग्रामीण कोटा व चैतन्य फायनान्स यासारख्या कंपनीकडून बचत गट महिलांना हप्ता भरण्यासाठी तगादा लावत आहे. पण सध्या कोरोनाच्या संकट काळात सर्व जण अडचणीत सापडला आहे, लोकांकडे पैसा नसल्याने सर्वजण त्रस्त आहेत.शासन व रिझर्व बँकेच्या आदेशानुसार ऑगस्ट पर्यंत कोणत्याही बॅका व कंपन्यांनी वसुली करायची नाही असे सक्त सुनावले आहे.तरीही जत तालुक्यात वसुलीचा प्रकार घडत आहे.
या संदर्भात पंतगे यांनी संबधित फायनान्स कंपन्याकडे चौकशी करुन लॉकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना वसूलीला परिस्थिती सुरळीत होईपर्यत स्थगिती देण्याच्या सुचना केल्या आहेत.तरीही बचत गट महिलांना त्रास देण्याचा प्रकार उघडकीस आला तर आंदोलन करू असा इशाराही दिनकर पतंगे यांनी दिला आहे.यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख तुकाराम डफीन उपस्थित होते.