सोन्याळ,वार्ताहर : दुष्काळातून सावरत जत तालुक्यातील अवकाळी पावसाने ओलावा निर्माण होताच शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीची लगभग सुरू झाली आहे.मान्सूनपुर्वची गैरहजरी व भविष्यात पावसाची शक्यता गृहीत धरून कडधान्ये,बाजरी,मकाची पेरणी सुरू आहे.त्यामुळे कृषी दुकानात गर्दी वाढली आहे.
निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहून दरवर्षी शेतकरी नव्या उत्साहाने शेतात कामाला लागतो. यावर्षी ही चांगल्या पावसाची अपेक्षा मनात धरुन बळीराजा कामाला लागला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बळी राज्याच्या माथी कोरोनाचे व निसर्गाच्या लहरीपणाचे दुहेरी संकट असून दोन महिन्याच्या लॉकडाउनमध्ये शेतकरी शेतातील मालाला भाव न मिळाल्याने पुरता मोडून पडला आहे.
याहीवर्षी जत तालुक्यातील ग्रामीण भागात पेरणीपुर्व अंतर्गत मशागतीची कामे सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्यावर्षी काही भागाचा अपवाद वगळता निसर्गाने मनासारखी साथ दिल्याने असमाधानाचे वातावरण आहे. तरीसुद्धा अनेक ठिकाणी शेतकरी मशागतीसाठी बैलजोडी आणि ट्रॅक्टरचा आधार घेताना दिसत आहेत. खरिप हंगामासाठी अनेक ठिकाणी बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. काही बागायती क्षेत्र असणार्या गावामध्ये फळबागा, कडधान्य आणि भाजीपाल्यांचा निपटारा सुरु आहे. त्यातच दोन आठवड्यापासून आभाळाचे वातावरण असून ढगाळ वातावरण असल्याने मान्सुन पावसाला लवकरच सुरुवात होईल असे चित्र सध्यातरी दिसत आहे. तालुक्यात खरिप हंगामात मुख्यत्वे बाजरी, मुग, मटकी,सूर्यफूल व सोयाबीन या पिकांच्या पेरणीसाठी शेतीची मशागत सुरु आहे. उत्तम पध्दतीने बियाणे वापरण्यासाठी कृषी विभाग आपल्यापरीने झटताना दिसत आहे. तर कृषी विभागाने शेतकर्यांना बांधावर जावून खते व बियाणे देण्याची तयारी दर्शविली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच चांगल्या दर्जाची बियाणे मिळविण्यासाठी शेतकरी दुकानातून खरेदी करताना दिसत आहेत.
जिल्हा व तालुका कृषि विभागाचे नियोजन
खरिपाचा हंगाम जवळ येऊन ठेपला आहे.त्यामुळे शेतकरी, कृषि विभागाने त्याची तयारी सुरु केली आहे. यात शेतकर्यांना वेळेचे आत बी-बीयाणे,खते पाहोचविणे, बोगस बियाणांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषि विभाग नियोजन करत आहे. तसेच लॉक डाऊनच्या काळात शेतकर्यांसाठी मुबलक प्रमाणात बी-बीयाणे,खतांचा साठा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी अधिकारी प्रयत्न करत आहेत.भारतीय हवामान विभागाच्या आंदाजानुसार यंदाचा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त ठरणार असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.