संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे ; मौलाली मणेर

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभाग व 67 गावातील नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालय अभावी होणारी अडचण व गैरसोय दूर होण्यासाठी संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे यासाठी लवकरच राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेस सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष मौलाली मणेर यांनी दिली. 

मणेर म्हणाले, जत हा तालुका सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असणारा कर्नाटक राज्याच्या सिमेवरील कायमस्वरूपी दुष्काळी असा तालुका आहे.या तालुक्यात एकून एकशे वीस गावे आहेत. 

तालुक्यात जत येथे तहसिल कार्यालय असून संख येथे अप्पर तहसिल कार्यालय आहे. संख अप्पर तहसिल कार्यालय अंतर्गत चार मंडल विभाग येतात. या विभागात संख,उमदी, माडग्याळ व मुचंडी या मंडलविमागाचा समावेश होतो. या चार विभागात एकून 67 गावे असून या सर्व गावाचा महसुली कारभार हा अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चालतो. 

संख येथे अप्पर तहसिल कार्यालय झाल्यापासून जत पूर्व भागातील नागरिकांची एकच मागणी वारंवार जोर धरू लागली आहे की, राज्य सरकारने ज्या प्रमाणे जत पूर्व भागातील लोकांची अप्परतहसिल कार्यालयाची मागणी त्वरित पूर्ण करून जत पूर्व भागातील लोकांचा जत तहसिल कार्यालयात विविध कामांसाठी ये जा करण्यासाठी होणारा,हेलपाटा,अनमोल वेळ व पैशाची बचत करण्याचे काम केले आहे. त्याप्रमाणेच संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून जत पूर्व भागातील चार मंडल विभागातील व 67 गावातील लोकांची दुय्यम निबंधक कार्यालया अभावी होणारी अडचण व गैरसोय दूर करावी. 

संख येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू झाले असून महसुल विभागाची बहुतांशी कामे ही या कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. परंतु  संख अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभाग व या विभागातील 67 गावातील लोकांना त्यांच्या जमिनिचे, घरजागेचे, प्लाॅटचे व्यवहार तसेच विविध बॅंकाकडील,सोसायट्याकडील  तारणगहाणखत, तसेच बक्षिस पत्र व मृत्यूपत्र आदी कामासाठी येथील नागरिक व पक्षकारांना तालुक्याच्या ठिकाणी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयातच येणेशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. 

संख या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यास या भागातील लोकांचा जत येथे जाणे-येणेचा त्रास वाचणार आहे. व संख पासून जत दुय्यम निबंधक कार्यालयाचे अंतर ही लांब असल्याने व दुय्यम निबंधक कार्यालयात आल्यानंतर जत पूर्व भागातील लोकांची कामे एका दिवसात न होता. त्यासाठी चार चार दिवस पक्षकारांना कामासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचा येथील पक्षकारांना अनेक वेळा अनुभव आला आहे. तसेच याकामी त्यांचा वेळ व पैसाही खर्च झाला आहे. 

जत पूर्व भागातील संख येथे नविन दुय्यम निबंधक कार्यालयास लवकरात लवकर मंजूरी मिळून हे कार्यालय लवकरात लवकर सुरू होऊन येथील नागरिक व पक्षकारांची सोय व्हावी यासाठी आम्ही लवकरच राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री ना. डाॅ.विश्वजित कदम यांची जतचे अभ्यासू व क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासह भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत असेही श्री.मणेर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.