जतेत कोरोनाची भिती गायब | सोशल डिस्टन्सिंग फज्जा : प्रशासनाचे आदेश पायदळी
जत,प्रतिनिधी : जत शहरात कोरोनाचे दोन रूग्ण आढळून आल्याने शहरातील व्यापारी असोसिएशन व जत नगरपरिषदेने अत्यावश्यक सेवा वगळता जत शहर चार दिवसासाठी लाॅकडाऊन केले होते.परंतु चार दिवसाच्या लाॅकडाऊन नंतर परत एकदा शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी व वाहतुक कोंडी आहे.नगरपरिषदेकडून सम विषम वाहतूक व दुकानाची खोलण्याची आदेश गायब झाल्याचे स्पष्ट होत आहे.प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराविषयी जत शहरवासियांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील अंकले,वाळेखिंडी, आवंढी, खलाटी या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर खलाटी येथील कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या जत येथिल एकाला व त्याच्या संपर्कात आल्याने त्याच्या आईलाही कोरोणाची बाधा झाली आहे.

जत शहरात कोरोनाचे दोन रूग्ण आढळून आल्याने जत येथील व्यापारी असोसिएशन व जत नगरपरिषदेने अत्यावश्यक सेवा वगळता जत शहर चार दिवसासाठी पूर्णपणे लाॅकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रमाणे जत शहर चार दिवस पूर्णपणे बंद ठेवले होते.चार दिवसाचे लाॅकडाऊन संपल्यानंतर आज गुरूवारी परत जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी ही दिसून येत होती. बाजारपेठेतील सराफ व्यवसाईकांच्या दुकानात, मोबाईल शाॅपी, भांडी व इलेक्ट्रॉनिक दुकाने, रस्त्यावरील भाजी व फळविक्रेते तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया,तहसिल कार्यालय आवार आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करून उभे असलेले दिसत होते.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी शाररिक अंतर ठेवणे हे आवश्यक असताना लोकांकडून ते पाळले जात नव्हते. बाजारपेठेत लोकांनी आज जत्रेसारखी गर्दी केली होती. जतच्या बाजारपेठेत जत नगरपरिषदेने पेठेतील मारुती मंदिर ते जत नगरपरिषद या मार्गावर दुचाकी वाहन पार्किंग साठी पांढरे पट्टे आखले होते. पण त्याचा काही उपयोग होताना दिसत नव्हता.
शहरातील बाजारपेठेत एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांचे कोणाचेच लक्ष या झालेल्या गर्दीकडे व वाहतूक कोंडीकडे नव्हते.वाहतूक पोलीस व इतर बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस कर्मचारी दिसत नव्हते. त्यामुळे मोटारसायकल वरून मास्क न लावता विनाकारण फिरणारे लोक, तसेच एका मोटारसायकलवरून तीघे तीघे बसून शहरातून फेरफटका मारणारे टवाळखोर यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नव्हते.
प्रशासनाने जत शहरातील नागरिकांच्या बाबतीत अशी भूमिका घेतली तर कोरोनारूपी ही महामारी जतशहरभर पसरल्याशिवाय राहाणार नाही.त्यातच जत शहरांत प्रशासनाची परवानगी न घेता बाहेरील जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राजस्थान येथून आलेल्या लोकांपासून जत शहरवासियाना सतर्क रहावे लागत आहे. त्यातच जत येथिल कोरोना संशयित 53 लोकांचे स्वॅब आरोग्ययंत्रणेने तपासणीसाठी मिरज येथे पाठविले आहेत त्याचा अहवाल काय येतो याकडे प्रशासनाचे व जत शहरवासियांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत प्रशासनाचे या भूमिकेबद्दल जत शहरवासियांतून तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जत शहरात गुरूवारी झालेली तूफान गर्दी