जतमधील कोरोना बाधितांच्या संपर्कातील 16 व खबरदारी म्हणून घेतलेले 53 जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दिलासा देणारी बातमी शुक्रवारी आहे.जत तालुक्यात बाहेरून आलेल्या वयोवृद्ध 53 व जत शहरातील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 16 जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह,जतकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.
जत तालुक्यात कोरोनाचे गत आठवड्यात नवे तीन रुग्ण सापडताच खळबळ उडाली होती.या तिघाचा शहरात मोठ्या प्रमाणात संपर्क झाल्याचे समोर येत होते.त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येत होती.खलाटीतील कोरोना बाधितांच्या संपर्कातील जत शहरातील एकजण कोरोना बाधित झाला होता.तर त्यांच्या संपर्कामुळे त्यांची आई कोरोना बाधित झाली होती.या सर्वांच्या संपर्कातील सुमारे 27 जणांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांचे सर्वाचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याशिवाय खबरदारी म्हणून तालुक्यात बाहेरून आलेल्या सुमारे 53 वयोवृध्दाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्या सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शहरात एकाचवेळी एवढ्याचा जणांची तपासणी होत असल्याने भितीचे वातावरण पसरले होते.प्रशासनाचेही या रिपोर्टकडे लक्ष लागले होते. गुरूवारी मध्यरात्री 53 वयोवृद्ध व बाधित महिलेच्या संपर्कातील 16 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी सांगितले.

दरम्यान पुढील चौदा दिवस हे सर्वजण आरोग्य विभागाच्या निगरानी खाली राहणार असल्याचेही डॉ.बंडगर यांनी सांगितले