जानकरांनी निर्माण केलेला इतिहास पुसण्याचा प्रयत्न अशक्य | अजितकुमार पाटील यांची आण्णा डांगे याच्यांवर टिका

0

जत,प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्या

होळकर यांच्या जयंतीदिवशी त्यांच्या जन्मगावी चोंडी येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आण्णा डांगे यांनी राष्ट्रीय़ समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांच्यावर केलेली टीका विकृत मानसिकतेची निदर्शक आहे. आण्णा डांगे यांनी जानकरांविषयी असलेले व्देषाचे विष चोंडी या पवित्र ठिकाणी बाहेर टाकले, मात्र त्याचा काहीही परिणाम होणार नाही. असीम त्यागातून जानकरांनी उभे केलेले कार्य पुसायला आण्णा डांगे यांच्या सारख्यांना सात जन्मही पुरे पडणार नाहीत, अशी टीका रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केली आहे.



चोंडी येथे बोलताना अण्णा डांगे यांनी आम्ही (राम शिंदे व अण्णा डांगे) करतो त्याच्याविरूद्ध महादेव जानकर करतात, अशी टीका केली आहे. ”महादेव जानकर आणि राम शिंदे हे दोघेही पाठीमागील सरकारमध्ये मंत्री झाल्यावर कुणाच्या नेतृत्वाखाली जयंती साजरी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. 

त्यावेळी जानकरांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला, राम शिंदे हे अहिल्य़ादेवींचे वंशज असल्याने त्यांनी चोंडीत जयंती चालू केली”, असेही डांगे यांनी म्हटले होते. वस्तुत: अहिल्यादेवींच्या जयंतीदिवशी सकारात्मक बोलायले पाहिजे, मात्र डांगे चुकीचे बोलले. त्यांची वर्षानुवर्षांची मळमळ बाहेर आली. असे बोलून त्यांनी स्वत:ची योग्यता दाखवून दिली, अशी टीकाही अजितकुमार पाटील यांनी केली आहे.

अजितकुमार पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, महादेव जानकर यांनी राजकीय जागृतीसाठी चोंडी येथे अहिल्यादेवी जयंती सुरू केली.डांगेंची संघटना तिथे पुण्यतिथी करत होती, म्हणून त्यांचा जानकरांच्या जयंती कार्यक्रमाला विरोध होता.31 मे रोजी दरवर्षी होणाऱ्या जयंती कार्यक्रमासाठी महिना दीड महिने कार्यकर्ते राबत होते. महादेव जानकर 1992 पासून घरदार सोडून समाजाची राजकीय चळवळ चालवत होते. त्याचा परिणाम म्हणून जंयतीचा कार्यक्रम मोठा होत गेला. हजारोंची गर्दी वाढत गेली. ते पाहून आण्णा डांगेसह अनेकांच्या पोटात दुखू लागले. म्हणून तो कार्यक्रम बंद पाडण्याचे कारस्थान आण्णा डांगे यांच्यासह विरोधी नेत्यांनी रचले.2002 साली महादेव जानकर यांच्या माध्यमातून होत असलेली जयंती बंद पडावी म्हणून डांगेंनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री चोंडीत आणले. जानकरांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली गेली. मोठा संघर्ष झाल्यावर चोंडीच्याबाहेर चार किलोमीटवर कार्यक्रमाला परवानगी दिली. तो कार्यक्रम जानकरांच्या जाबाँज कार्यकर्त्यांनी यशस्वी केला होता.

Rate Card




 हा सर्व प्रकार समाज विसरलेला नाही. डांगे कौतुक करत असलेले राम शिंदे हे त्यावेळी विरोधातच होते. डांगें सारख्यांनी जंग जंग पछाडूनही जानकरांनी सुरू केलेली जयंती बंद पडली नाही.31 मे 2003 रोजी याच जयंती कार्यक्रमात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करण्यात आली. उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी एक राजकीय पर्याय चोंडीत तयार करून दिला. हे वादळ थांबू शकत नाही, हे लक्षात आल्यावर राम शिंदे जयंतीसाठी काही सुविधा उपलब्ध करू लागले, हे सगळे लोक जाणतात. पुढील काही वर्षात जानकरांच्या कार्यक्रमात स्वत: आण्णा डांगेही आले होते. डांगेंची कुटील कारस्थाने विसरून जानकरांनी त्यांना मानसन्मान देण्याचा प्रयत्न केला.  जानकरांनी डांगेविरूद्ध काहीही केलेले नाही. त्यांनी स्वत:ची पायवाट तयार केली. ती पायवाट आता हमरस्ता झाली आहे. चोंडीला आलेले महत्व आता कोणीही कमी करू शकणार नाही. जानकरांनी केले तेच टिकाऊ होते, हे आता सिद्ध झाले आहे.तरीपण आण्णा डांगे चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणे वागत आहेत.आण्णा डांगे यांनी राम शिंदे यांचे कौतुक करत जानकरांवर टीका करण्याचा केलेला प्रयत्नही निषेधार्ह आहे. कारण राम शिंदे हे जानकरांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. आमदार, मंत्री होते, एवढीच त्यांची ओळख. त्यांचे समाज संघटन आणि जागृतीत काहीही योगदान नाही. भाजप नेतृत्वाची चमचेगिरी करण्यासाठी त्यांनी जानकरांना विरोधच केला आहे. एवढी असूनही गेल्या काही वर्षात चोंडीतील कार्यक्रमात त्यांना मानाचे स्थान दिले. महादेव जानकरांनी 2016 ला मुंबईत जयंती घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी जानकर मंत्री नव्हते. त्यावेळी राम शिंदे राज्यमंत्री होते. त्यामुऴे दोघे मंत्री झाल्याने नेतृत्वाचा प्रश्न आला, या डांगेंच्या आरोपात काही तथ्य नाही. जानकरांनी चोंडी राजकीय तिर्थक्षेत्र बनवले, आता राष्ट्रीय पातळीवर जयंती होण्यासाठी कार्यक्रम मुंबईला नेला. त्यांनी दिल्लीतही जयंती करण्याचा संकल्प केला आहे. 




जानकरांनी चोंडीतला जयंती कार्यक्रम समाजासाठी खुला केला, तो राम शिंदेंच्या नेतृत्वासाठी नव्हे. जानकरांच्या कार्यक्रमामुळे तिथे दरवर्षी हजारो लोक येण्याची वहिवाट पडली होती. मात्र त्या लोकांवर स्वत:चे नेतृत्व थोपण्याचा प्रयत्न राम शिंदेनी केला. स्वत: च्या स्वार्थासाठी अनेकांवर पोलिस केसेस केल्या, हे समाजाला माहिती आहे. त्यामुळे जानकरांचे उद्दिष्ट वेगळे आहे आणि राम शिंदेंनी काय करावे हे जानकरांच्या हातात नाही. त्यामुळे राम शिंदेनी पुन्हा जयंती सुरू केली, म्हणणे चुकीचे आहे. अहिल्यादेवींच्यासाठी येणाऱ्या लोकांना तिथे कोणत्या नेत्याची गरज नाही. तिथे सर्वपक्षिय नेतेमंडळी येत असतात. दुसरी बाब म्हणजे राम शिंदे हे अहिल्यादेवींचे वंशज आहेत, असे आण्णा डांगे यांनी म्हटले आहे. अगोदर ते वंशज कसे आहेत, हे डांगेंनी समाजाला सांगावे. कारण ते सपशेल खोटे बोलत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आण्णा डांगे यांच्याकडे नाहीत. जानकरांनी निर्माण केलेला इतिहास पुसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र ते कदापि शक्य होणार नाही, असे अजितकुमार पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.