जत कृषी विभागात कोट्यावधीचा भ्रष्टाचार ; माजी आ. विलासराव जगताप :

0
Rate Card

कृषिमंत्री, कृषी आयुक्तांकडे तक्रार 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कृषी विभागामार्फत शेडनेट, पॅकहाऊस, हरितगृह, नालाखोलीकरण व रूंदीकरण केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. नवाळवाडी येथील दोन, आसंगी व सनमडी येथील शेतकऱ्यांनी शेडनेट उभारणी न करता अनुदानाची रक्कम काढली आहे. याची चौकशी होवून, याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला आहे.मात्र,अद्याप कारवाई झाली नाही. तात्काळ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी आ. विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केली.

याबाबची तक्रार कृषीमंत्री, कृषी आयुक्त व विभागीय कृषी महासंचालक कोल्हापूर यांच्याकडे केली आहे. 

माजी आ. विलासराव जगताप म्हणाले, तालुक्यात आठ शेडनेटची कामे मंजूर होती. त्यापैकी सहा कामांना मंजूरी मिळाली व दोन रद्द केली. या सहा जणांना कशी मंजूरी दिली व दोघांची कामे का रद्द केली, याचीही चौकशी करावी. तर सोन्याळ गावातील तिघा शेतकर्‍यांच्या ग्रीन हाऊसची जागेवर जाऊन चौकशी करावी. ग्रीन हाऊस व शेडनेट या सर्व कामांची मंजूर मोजमापप्रमाणे व शासकीय मार्गदर्शक सूचनेनुसार काम झाले आहे, का याची तपासणी करावी. यामध्येही मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदानाचा चुराडा करण्यात आला आहे.

माजी आमदार जगताप म्हणाले, सन 2018- 19 मध्ये 30 पंपहाऊस मंजूर करण्यात आले. यापैकी 2 रद्द झाले. तर 28 कामांची मोजमाप पाहिल्यास कुठेही ताळमेळ लागत नाही. या लाभार्थ्यामध्ये कृषी विभागाचे उप विभागीय अधिकारी कांताप्पा खोत यांनी अधिकाराचा गैरवापर करून आई सावित्री भिमाशा खोत (रा.संख) यांच्या नावे शासकीय अनुदानाचा लाभ घेतला आहे. याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी.

दरम्यान, सन 2018 – 19 मध्ये कृषी विभाग मार्फत नाला खोलीकरण, कंपार्टमेंट बंन्डीग, माती नाला बांध दुरुस्ती, सीसीटी व सिमेंट नाला बांध बंधारा, अशी 303 कामे करण्यात आली आहे. यामध्येही बोगस रक्कम खर्ची टाकण्यात आलेली आहे. शासनाच्या कोणत्याही सूचना अथवा नियम अटी धाब्यावर बसून नियमबाह्य कामे करण्यात आली आहे.तर जत उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत यांच्या पत्नी कविता खोत पंचायत समिती सदस्या आहेत. पत्नीच्या राजकीय भवितव्यासाठी ते स्वतः राजकारणात सक्रिय आहेत. निवडणूक प्रक्रियेत ही भाग घेतला आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने देखील याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.यावेळी महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार, सभापती मनोज जगताप, विष्णू चव्हाण, श्रीदेवी जावीर, मंगल जमदाडे, सुशीला तावशी, लक्ष्मी माळी, सुप्रिया सोनूर, रामाण्णा जीवानवर, स्नेहलता जाधव, सरदार पाटील, तमन्नगोडा रवी पाटील, सुनील पवार, आदी उपस्थित होते.उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी जत शहरात मोठा बंगला बांधला आहे. तसेच जत शहरात व गावी मुबलक शेती व जागा, अशी कोट्यवधीची मालमत्ता पदाचा गैरवापर करून जमा केलेली आहे. याचीही चौकशी लाचलुचपत विभागामार्फत करण्यात यावी, अशीही मागणी आम्ही  केली असल्याची माहिती माझी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.

  कोणत्याही चौकशीस तयार : कांताप्पा खोत

जत तालुक्यात माजी आ. जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांनीच कामे चांगली झाली म्हणून माझ्या अभिनंदनाचा ठराव घेतला. त्यांच्याच हस्ते कामांचे उदघाटन झाले. तिच कामे आता बोगस कशी?, यात विनाकारण माझ नाव गुंतवले जात असून या आरोपांमध्ये तथ्थ नाही. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यासाठी तयार आहे, असा खुलासा उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.