जत तालुक्याला अवैध गुटखा विक्रीचा विळखा
उमदी,वार्ताहर : कायद्याने बंदी असलेल्या गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू, मसाला याची विक्री जत व परिसरात सुरू आहे. शहर व परिसरातील किरकोळ व ठोक व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत. यामुळे जतला गुटख्याने विळखा घातला आहे.अन्न औषध प्रशासनाने याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. प्रत्येक दुकान, पानटपरीवर गुटखा पुरविला जातो. यासाठी लुना, मोटारसायकल, रिक्षा, टमटम, अशा वाहनांचा वापर करण्यात येत आहे. गावोगावच्या किराणा दुकानात गुटख्यांची विक्री सुरू आहे. कायद्याचे रक्षकच त्याचा आस्वाद घेताना दिसतात. त्यामुळे त्यांच्याकडून कारवाई होणे अशक्य असले तरी अन्न व औषध प्रशासनाने तरी याच्या विरोधात मोहिम उघडण्याची आवश्यकता आहे. अद्याप पावेतो एकदाही गुटखा,मावा विक्रीवर प्रशासनाने कारवाई केलेली नाही. गुटखा विक्री करताना त्यावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला असल्याने पोलीस याबाबत मौन ठेवतात. पोलीस व अन्न औषध प्रशासनाचा धाक नसल्याने गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या सभोतालीच गुटखा विक्री सुरू असते. परंतु, कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने पोलीस बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहेत.
जत तालुक्याच्या शेजारी कर्नाटक सीमा असल्याने, या प्रदेशातून गुटखा मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. साठवण केली जाते, विक्री होते. जवळपास 100 किरकोळ विक्रेते तयार झाले असून ठोक विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातून स्पर्धा सुरू झाली आहे. भाव तोडून विक्रीचा उच्चांक मोडला जात आहे.मावा, गुटखे, तंबाखूजन्य पदार्थ खाणार्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याने गुटख्याचे ग्राहक यासाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात. यात पैसा जास्त मिळतो. कारवाई नाही, यामुळे टपरीवाले, किराणा दुकानदार यातून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावत आहेत. गुटखा माफिया तयार झाले आहेत. याची अन्न व औषध प्रशासनाने वेळीच दखल नाही घेतली तर क्राईम करण्यासाठी बळ मिळेल, अशी भीती आहे. गुटखा बंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
