डेंगूचा डंक तालुकाभर बळावतोय | कधी जागा होणार आरोग्य विभाग
जत, प्रतिनिधी :जत तालुक्यात दुष्काळी स्थिती कायम असताना गेल्या काही दिवसात कमी, अधिक पडणार्या पावसामुळे जत शहरासह तालुक्यात डेंग्यूसह साथीच्या आजारांंनी थैमान घातले आहे. अनेक जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर येत आहे. डेंग्यूसह काविळ, चिकन गुनिया, टायफॉईड, कॉलरा अशा विविध साथरोगांचाही फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, हे साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध ठिकाणी, पाणी साठून डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा जास्त प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. साथजन्य आजारांनी ग्रस्त असलेला एकतरी रुग्ण प्रत्येक घरात आढळून येत आहे. पेशी कमी होत असल्यानेही अनेक जण आजारी पडत आहेत.जत शहरातील विविध सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये बरेसचे रुग्ण ताप व इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. यात प्रामुख्याने डेंग्यू या आजाराचे प्रमाण असणारे रुग्ण जास्त प्रमाणावर आढळून येत आहेत.

ऑक्टोबर महिन्याखेर शहरात एकूण शंभराहून अधिक रुग्ण डेंग्यू संशयित म्हणून आढळून आले आहेत. त्या सर्वांची आरोग्य विभागामार्फत रक्त तपासणी करण्यात आली असून, लागण झालेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत. तालुक्यात विविध भागांमध्ये डेंग्यूमुळे अनेकांचा जीव जात असताना, आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तच आहे. प्रशासनातर्फे ग्रामीण भागामध्ये डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणावर औषध फवारणी करणे गरजेचे असताना, आरोग्य यंत्रणेतर्फे मात्र कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. डेंग्यू, चिकनगुनिया, काविळीचा प्रादुर्भाव झालेल्या भागात धूरफवारणी करण्याची गरज आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
पावसाळ्यात अशी घ्यावी आरोग्याची काळजी
पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून घ्यावे. पिण्याचे पाणी झाकून ठेवावे व पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करावा. जेवणापूर्वी व बाळास घास भरविताना हात स्वच्छ धुवावेत. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गोळ्या वापराव्यात. शौचाला जाऊन आल्यास हात धुवावेत. जुलाब झाल्यास ओआरएस पाकिटे सरकारी दवाखान्यातून मोफत घ्यावीत. उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत. शिळे अन्नपदार्थ खाऊ नये. उघड्यावर शौचास बसू नये. अस्वच्छ व असुरक्षित पाणी पिऊ नये.
