जत,प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील आठही मतदारसंघात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. सभा, बैठका, मेळावे यांचे नियोजन सुरू झाले आहे. बहुसंख्य मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांसह सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चितीसाठी सर्वांनीच स्थानिक नेत्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत लावलेली फिल्डिंग अधिक गतिमान केली आहे. अर्थात ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे किंवा निश्चित आहे त्यांच्यासह इच्छुकांनीही यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली असून, त्याला आता अधिक गती येणार आहे.सांगलीतील आठपैकी चार मतदारसंघांमध्ये भाजप, दोन ठिकाणी राष्ट्रवादी आणि प्रत्येकी एका काँग्रेस आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे शह-काटशहाचे राजकारण रंगले होते. सोबतच पाच वर्षांत अनेक सत्ताकेंद्रांमध्ये फेरबदल झाला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार इच्छुकांची संख्याही त्या-त्या मतदारसंघांमध्ये वाढली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने आणि त्यातील काहीजणांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजप-सेना युतीचे मात्र अद्याप चर्चेचे गुर्हाळ सुरूच आहे. भाजपमध्ये एक-दोन मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने आपापल्या परीने नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली आहे. त्याचवेळी प्रचाराचेही नियोजन सुरू केले आहे. युतीचा फैसला न झाल्याने दोन्ही पक्षांकडून सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांनी नेत्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.