मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया
जत,(प्रतिनिधी): जत शहरातील नागरिकांना मुळात आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना संभाजी चौकात मुख्य जलवाहिनी फुटल्याने कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत आहे.
जलवाहिनी फुटून महिना झाला तरी नगरपरिषद याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकाच नळ पाणी पुरवठ्याद्वारे पाणी मिळत आहे. मुळात हा पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत असल्याने नागरिकांना आठ दिवस पाणी पुरवणे अशक्य होत आहे. शहराला यल्लमा विहीर, बिरनाळ पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा होत असून तलावात पाणी असतानाही फक्त आठवड्यातून एकदाच नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. शहराची लोकसंख्या पन्नास हजारांवर पोहचली असून नगरपरिषद शहराला पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे.
नागरिकांना आठ दिवस पाणी साठवून पुरवणे अशक्य असून शेवटी पाण्यासाठी लोकांना हातपंप, शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. नाही तर नागरिकांना गाड्या, सायकलींना घागरी बांधून कामधंदा सोडून पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे.पाणी टंचाई, स्वच्छता हे गंभीर विषय बनले आहेत.मात्र नगरसेवकच हाणामाऱ्या करत असल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे त्यांचे कसे लक्ष जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील संभाजी चौकात मुख्य जलवाहिनी फुटून पंधरा दिवस झाले. यातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. लोकांना नंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फुटलेली जलवाहिनी जोडायला नगरपरिषदेचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ही जलवाहिनी फुटल्याने निम्म्या शहराला अपुरा पाणी पुरवठा होत आहे.शहरात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे आम्ही पाणी पट्टी का भरावी, असा सवाल उपस्थित करत आहेत.
साठविलेल्या पाण्यात चार दिवसांत आळ्या जत शहराला आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो.नागरिकांना पाठी साठवून आठ दिवस पुरवावे लागते,मात्र साठविलेल्या भांड्यात चार दिवसांतच आळ्या होऊ लागतात.त्यामुळे असे पाणी फेकून द्यावे लागत आहे.किमान तीन दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जावा, अशी नागरिकांची मागणी आहे,पण याकडे नगरपरिषदेचे पदाधिकारी,अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
जत शहरातील संभाजी चौकातील मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे लोकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
Attachments area