उमदी-विजापूर महामार्गावर जीवघेणे खड्डे

उमदी : उमदी-विजापूर राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या महामार्गावरून मार्गक्रमण करताना ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी दयनीय अवस्था झाली असून ,राज्य महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. हा राज्य महामार्ग अडथळ्यांचा बनल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या राज्य महामार्गावरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. हा मार्ग कर्नाटकच्या विजापूर व त्यापुढील शहरांना जाण्यासाठी अतिशय जवळच आहे. पंढरपूरहूनही विजापूर येथे जाण्यासाठी सोयीचा व जवळचा असून, या भागांमध्ये मोठमोठे उद्योगधंदे वाढले आहेत. त्यांना लागणारा कच्चामाल या महामार्गाने अवजड वाहनातून नेला जात असतो.
मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे या महामार्गावरील कल्याणमध्ये कमालीची भर पडली असून, हे खड्डे चुकवावे तरी कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडल्याशिवाय राहात नाही. हे खड्डे चुकविण्याच्या नादात येथे रोज छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे व आडवे कटस् यामुळे या महामार्गावरील प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. या रस्त्यावरु न कोणतेही वाहन चालवितांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे डोळे झाक करतांना दिसून येत आहे. या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे लवकरात लवकर दुरूस्त करावेत अशी मागणी वाहनधारकांनी व नागरिकांनी केली आहे.
