गुरुदक्षिणा

0
Rate Card

मी दोन्ही पायांनी अपंग मुलगा. नियतिचा एक शापित. त्यामुळे सर्वसामान्य मुलांच्या वयात म्हणजे सहा वर्षे वयाचा असताना मला शाळेत जाता आले नाही. आठ वर्षांचा असताना माझ्याच आग्रहाने मला वडील शाळेत घेऊन गेले. यात दोष कुणाचाच नव्हता. कारण चाळीस एक वर्षांपूर्वी आमच्या शेतकरी कुटुंबाला शिक्षणाचे महत्व तेव्हा काय कळणार ? त्यात मी अपंग ! धडधाकट मुलांना शाळेत पाठवायची मारामार; मग मला कोण पाठवणार !

जून 1973 ला मी पहिलीत प्रवेश केला. पहिलीच्या वर्गावर त्यावेळी श्री. पाच्छापूरे गुरुजी शिकवत होते. त्यांनी मला टेबलाजवळच्या रांगेत अगदी पुढे बसायला सांगितले. हेतू हा की मी अपंग असल्याने इकडे तिकडे जाण्याचा मला त्रास होवू नये.उतार वयाचे, अगदी सडपातळ, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, अंगात पांढरा शर्ट, जाडसर धोतर नेसलेले हे गुरुजी मला पाहताक्षणीच आवडले. मला शाळेविषयी जिज्ञासा होती; ती आणखीनच वाढून गोडी वाटू लागली. त्यांच्याबद्दल जिव्हाळा, आपुलकी, प्रेम वाटू लागले. त्यांचं पूर्ण नाव धों. वि. पाच्छापूरे. ते आमच्याच जत तालुक्यातले वळसंग गावचे. ते मला ‘ म्हादबा’ अशी प्रेमाने हाक मारत. सगळ्यांना टेबलाजवळ बोलावून धडे देत. मला टेबलाजवळ जाणे जरा त्रासाचे होई. पण गुरुजी स्वतः उठून येत आणि माझ्यापुढे अगदी जमिनीवर बसून मला शिकवत. मला शिक्षणाची आवड होतीच. त्यांनी दिलेला धडा मी दुसऱ्या दिवशी तोंडपाठ करी. हे पाहून त्यांना अतिशय आनंद होई. ते इतर शिक्षकांना, माझ्या पालकांना तर माझे कौतुक सांगतच पण इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनाही माझ्याविषयी अभिमानाने सांगत. हे मी अनेक वेळा ऐकले, अनुभवले. त्यांनी मला कधीही छडी मारली नाही. ते अतिशय सुरेख शिकवत. सर्व मुले एकाग्र होत. माझा पहिलीपासून दहावीपर्यंत वर्गात पहिला नंबर कधी चुकला नाही. दहावीत मला 80.28 टक्के गुण मिळाले.

मला चालता येत नसल्याने वडील किंवा घरचे कोणीतरी मला सकाळी शाळेत सोडत व संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी नेण्यास येत. कधी कधी उशीर होई. अशा वेळी गुरुजी अनेक वेळा माझ्याजवळ शाळेच्या व्हरांड्यात खांबाला टेकून बसत. इकडचे तिकडचे काहीतरी सांगत. असा हा गुरु शिष्याचा जन्मांतरीचा ऋणानुबंध तीन वर्षे टिकला. मी तिसरीत असेपर्यंत तेच आमचे वर्गशिक्षक होते. तिसरीत असताना त्यांची बदली झाली. मला खूप वाईट वाटले.

गुरुजींच्या पुनर्भेटीचा योग त्यानंतर सुमारे दीड वर्षांनी आला. चौथीचा शेवटचा आठवडा असावा. काहीतरी कामानिमित्त गुरुजी आमच्या गावी म्हणजे शेगांवला आले होते. मीही शाळेतच होतो. मित्रांना मी माझ्याकडे गुरुजीना बोलावून आणायला पाठवले.’मी येणारच आहे’ असं त्यांनी मित्रांना सांगितले. आणि खरोखरच गुरुजी मधल्या सुट्टीत माझ्याकडे आले. 

“काय म्हादबा, काय म्हणतोय. बरं आहे का ?” येताच त्यांनी विचारलं. 

“होय” एवढेच मी म्हणालो. 

“आणखीन कसं काय चाललंय.. घरचे कसे आहेत….” वगैरे अस्थेने चौकशी केली. 

“चांगलं आहे. तुमचे कसे आहे ?” मी विचारले. असेच थोडावेळ बोलणे झाले आणि गुरुजी जाण्यासाठी निघाले. 

“गुरुजी, हे घ्या. चहा प्या.” मी म्हणालो. 

“नको नको. अरे चहा प्यायल्याचा आनंद आहे मला.” गुरुजी म्हणाले. 

“असू द्या. घ्या गुरुजी माझे एवढे…” रुद्ध कंठाने माझ्या तोंडून शब्द निघाले. 

मी फक्त 18 पैसे गुरुजीना दिले. तेवढेच माझ्याजवळ होते. त्यांनी ते घेऊन खिशात ठेवले. त्यांच्या आणि माझ्या डोळ्यांतून आपोआपच अश्रू ओघळले.

त्यावेळी एक कप चहा 20 पैशात मिळत होता.त्यानंतर त्यांची व माझी पुन्हा भेट झाली नाही. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्याचे मला कळले. अपसुकच त्यांच्या पवित्र स्मृतीस मस्तक झुकले.असे गुरुजी मला लाभले याचा मला अभिमान वाटतो. मी भाग्यवान ठरलो. मी कष्टाने, जिद्दीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. शासनदरबारी अनेक अर्ज विनंत्या करुनही अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळाली नाही. पण गुरुजीनी दिलेले धडे मला माझ्या जीवनात उपयोगी पडले आहेत. मी प्रकारचे साहित्यिक लेखन करतो. शब्दांनी माझ्या जीवनात हिरवळ फुलवली आहे.गुरुजींचा वसा घेऊन मीही 1991 पासून विद्यार्थ्यांना नियमितपणे अगदी त्यांच्या समोर बसून शैक्षणिक अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन करतो.

                          – महादेव बी. बुरुटे 

                            शेगाव ता. जत 

                            मो.9765374805 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.