| आधारवड | मला भावलेले दादा : कै.पि.डी.चव्हाण |

0
3

दादांचा आज प्रथम स्मृतीदिन…

डफळापूर या ऐतिहासिक नगरीत,कर्तबगार लोकरत्नांची खाण,अशा नगरीमध्ये दादांचा जन्म 25 एप्रिल 1935 रोजी शेतकरी कुंटुंबामध्ये झाला.त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरूवात गावातील मराठी शाळेतून झाली.शिकण्याची ओढ त्यांना सर्व त्रासापेक्षा महत्वाची ठरली.जत येथे  विजयसिंह राजेंनी गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या सोयीचा फायदा घेत  माध्यमिक शिक्षण राजे रामराव विद्यामंदिर,जत येथे झाले.आर्थिक चणचण, कोणतीही साधने नसल्याने दादांनी अनेक दिवस डफळापूर-जत पायी प्रवास केला.त्यांची प्रबळ इच्छाशक्ती,जिद्द व चिकाटी त्यांना त्यांच्या आयुष्याच्या खडतर प्रवासात निर्णायक ठरली.दादांनी शिक्षण घेत असताना प्रामाणिकपणा,नीटनेटकेपणा,नम्रपणा,प्रचंड महत्वाकांक्षा,जिद्द व चिकाटी हे गुण जपले होते.जतचे तत्कालीन राजे श्रींमत भाऊसाहेब महाराज यांनी ते हेरले होते.कालांतराने श्रीमंत भाऊसाहेब महाराज मुंबईचे पोलीस कमिशनर असताना त्यांना दांदाची गुणवत्तेची दखल घेत पोलीस दलात अधिकारी होण्याची संधी दिली.पोलीस खात्याची नोकरी म्हणजे एक आव्हानात्मक जीवन,सद् रक्षण व खलनिग्रह हे या खात्याचे ध्येय.दादांना तर ते चपखल लागू पडले,कारण हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजून दादांनी कर्तव्यास जवळ केले.पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक वाढला.

“झिजल्या वाचून किर्ती कैसी,मान्यता नाही फुकाची”

या समर्थांच्या वचनाप्रमाणे दादांची मान्यता ही झिजण्याशी निगडीत होती.यातूनच पदोन्नतीच्या पायऱ्या ते क्रमाक्रमाने चढू लागले.केवळ दहा वर्षाच्या सेवेत ते सब इन्स्पेक्टर झाले.नाशिक येथील प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले,आणि अधिकारी म्हणून सर्वप्रथम कोल्हापूर येथील लक्ष्मीपूरी पोलीस स्टेशन येथे पदभार स्विकारला.गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या दादांनी महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात यशस्वी सेवा बजावली.अनेक अवघड गुन्हे उघडीस आणले.अल्प कालावधीसाठी मिळालेल्या रेल्वे पोलीस दलातील पदाचा वेगळा ठसा उमटविला.पोलीस दलातील यशस्वी कामगिरीबद्दल 1985 ला त्यांना पोलीस इन्स्पेक्टर या पदावर बढती मिळाली.सांगली,मिरज,व कोल्हापूर खरी दादांची कर्मभूमी राहीली.उच्च राहणीमान,करारी व्यक्तितत्व यामुळे गुन्हेगाराची दादांपुढे भंबेरी उडायची.मला आलेला अनुभव सांगायचा तर मी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अडचणीत असताना तिथल्या चौकामध्ये दादांचा अपघात झाला होता.त्यांना उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले होते.तशा अवस्थेतही त्यांनी माझी विचारपूस करून माझी अडचण समजून घेत मोलाचा कायदेशीर सल्ला दिला होता.तो भविष्यात मला अतिशय महत्वाचा ठरला.दादांना आय.पी.सी.मधील सर्व कलमे तोंडपाठ होती.त्यांच्या या ज्ञानामुळे त्यांना सांगली शहरात “पी.डी.अँक्ट” अशी गौरवास्पद उपाधीच मिळाली होती.त्यांनी पंचनामा केलेला कोणताही अपराधी सुटू शकला नाही.कायदेशीर अडचणीच्या वेळी अनेक वरिष्ठ अधिकारी अगदी, डी.एस.पी.सुद्धा दादांचा सल्ला घेत असत.राजकीय दबावाला न जुमानता काम करण्याची त्यांची पध्दत जिल्हाभर परिचित होती. डफळापूरचे ग्रामस्थ,व व्यापारी सांगलीत अडचण आल्यावर दादांच्या नावाचा आवर्जून  उल्लेख करायचे.उच्च पदावर असतानाही त्यांनी जन्मभूमी विसरली नाही.ते आवर्जून डफळापूर येथे येत मित्र परिवारात रमत असत.त्यांनी कधीही पदाचा बडेजाव केला नाही.आई-वडीलांचे आदर्श संस्कारामुळे त्यांनी कुंटुबही नेटकेपणाने जपले.रामायणातील बंन्धूप्रमाणे त्यांनी आपल्या कनिष्ठ बंन्धूंना प्रेम दिले.आपल्या कुंटुबातील सर्व सदस्य शिकले पाहिजेत,यांकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचे.त्यामुळे त्यांच्या कुंटुबातील त्यांचे बंन्धू,पुतणे, मुले,मुली वकील,अभियंता,आदर्श शेतकरी,राजकारण,पोलीस दल, व्यवसायात उच्च पदावर आहेत.38 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर डिवायएसपी पदावरून दादा सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्तीनंतरही दादांनी डफळापूरच्या समाजकारणात वेगळा ठसा उमटविला.डफळापूरचा ऐतिहासिक दसरा मोठ्या प्रमाणात भरविण्यात मोठे योगदान दिले.सर्व जातीधर्मातील लोंक त्यात सामील होत.यावेळी ते ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करत असत.दादांच्या यशात त्यांच्या धर्मपत्नी सुधाताईंचा मोठा वाटा होता.दादांच्या व्याप्त कामात घर संभाळत वेगळेपण जपले.त्यांनी आपली मुले उच्च शिक्षित बनविले.आज दादांचे मोठे चिंरजिव सतिश अभिंयते आहेत.त्यांचा सांगली येथे यशस्वी उद्योग सुरू आहे.कनिष्ठ चिरंजिव विजय डफळापूर येथे प्रगतिशील शेतकरी आहेत.दादांच्या पश्चात विजय सामाजिक कार्य चालवितात.रोखठोकपणा,अन्यायाविरूध्द आवाज उठविण्याची वृत्ती,थोराचा मान-सन्मान यातून ते डफळापूरचे सामाजिक नेते आहेत.दुर्लक्षित जत तालुक्यातील कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असतानाही ते यशस्वी पोलीस अधिकारी ठरले.दादांची जीवनगाथा समुद्रातील दिपस्तंभच ठरली आहे.त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी 

विन्रम अभिवादन…

शंब्दाकन मा.वसंतराव चव्हाण

सेवानिवृत्त मुख्याध्यापक,

छत्रपती शिवाजी हायस्कूल,डफळापूर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here