:
जत,प्रतिनिधी : मी गेल्या 25 वर्षांपासून जत तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे.जतच्या विकासात्मक कामासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणार आहे.पक्ष उमेदवारी देईल याची खात्री आहे.त्यामुळे येत्या गुरुवारी दि.25 जुलै रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा येळवी येथे आयोजित केला आहे,अशी माहिती सांगली बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जमदाडे ते पुढे म्हणाले की,तालुक्यातील शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,नोकरदार, व्यापारी आदी सर्व घटकांच्या अडचणी समजून त्या वेळोवेळी सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला.सांगली बाजार समितीच्या 11 वर्षाच्या पदाच्या माध्यमातून जत बाजारसमितीचे विभाजनाचा दबाव असतानाही ते होऊ नये यासाठी यशस्वी प्रयत्न केले.छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल,सांस्कृतिक भवन,धान्य चाळण यंत्र,भाजी कट्टा आदी कामे करत बेदाण्यावरील 5 टक्के व्हॅट खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून कमी केला.तर गुड्डापूर साठवण तलाव पूर्ण करण्याबरोबरच पत्नी मंगल जमदाडे यांच्या सभापती पदाच्या माध्यमातून सर्वसमान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.गेल्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनात कधी दलाली केली नाही.कार्यकर्त्यांची फसवणूक न करता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो.जत तालुक्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे.यापुढे सर्वांच्याच न्यायहक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि माझ्या विकासकामाच्या संघर्षाला बळ देण्यासाठी येणाऱ्या काळात तालुक्यातील जनतेच्या पाठींब्याची व आशीर्वादाची गरज असून गुरुवारच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण़्याचे आवाहन जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
जत | राजकीय पटलावरील दोन चाणक्यांचे तीसरे समीकरण |
विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नावर मेळाव्यात होणार चर्चा
जत तालुक्यातील वंचीत 65 गावासाठी विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना त्वरित मंजुरी देऊन कामाला सुरुवात करावी,67 रब्बी गावांना खरीप हंगामातील समाविष्ट गावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी.,संख अप्पर तहसील ला जोडलेली 13 गावे पूर्वीप्रमाणे जत तहसीलला जोडावीत, उमदी अप्पर तहसील कार्यालयासाठी स्वतंत्र कर्मचारी मंजूर करावेत,वाळेखिंडी, बेवणुर,नवाळवाडी ही गावे टेंभू योजनेत समाविष्ट करावीत,म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमधून मायथळ येथून खोदकाम करून माडग्याळ ओढ्यातून पाणी सोडावे,पीक विम्याची भरपाई त्वरित द्यावी,जत उत्तर भागातील 11 गावे संख महावितरणला जोडली आहेत.ही गावे उपविभागाला जोडावीत.7/12 व 8 अ खाते उतारे संगणकीय करताना चुका झालेल्या आहेत.त्या दुरुस्ती करण्यासाठी गावनिहाय मेळावे घेऊन दुरुस्ती करावेत.बेरोजगार तरुणांसाठी मोठे उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रयत्न करावेत,कवठेमहांकाळ-जत-गुड्डापूर-विजापूर व पंढरपूर-उमदी-विजापूर रेल्वे मार्ग मंजूर करण्यात यावा.यासह अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जमदाडे यांनी केले.