जत – यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाची तीव्रता कमालीची जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली आहे. परिणामी हा व्यवसाय तेजीत आहे. असे असले तरी शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विकण्याचा सपाटा काही व्यावसायिकांनी सुरू केला आहे पाणी शुद्ध केले जाते की नाही, कमी कालावधीत बक्कळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी बाटलीबंद परंतु अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.
उन्हाळ्यात काही विक्रेत्यांकडून बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. काही कंपन्यांचे पाणी ‘मिनरल’ असते तर काही कंपन्या ‘पॅकेज्ड वॉटर’च्या नावाखाली बाटलीबंद पाणी विक्री करीतआहेत.सर्वत्र पाणपोईंची संख्या घटली आहे. अनेक सेवाभावी संस्था उन्हाळ्यात पाणपोई सुरू करीत होत्या. आता ही स्थिती बदलली आहे. त्यामुळे पाणपोई अथवा नळावर जाऊन पाणी पिणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. सर्वांना बाटलीबंद पाण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. आता बाटलीबंद पाणी विकत घेणे म्हणजे प्रतिष्ठेचेही लक्षण झाले आहे. हॉटेलातील पाणी पिणेही टाळण्यात येत असून बाटलीबंद पाणी खरेदी करण्यात येत आहे.काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून ते थंड करून ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. सामान्य नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणी विक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. यातूनच पाणी विक्रीचा व्यवसाय आता ग्रामीण भागातही फोफावू लागला आहे.
बॉटल, पाऊचवर तारीख दिसत नाही
पॅकबंद वस्तूंच्या वेष्टनावर निर्मिती आणि त्या वस्तूच्या उपयुक्ततेचा कालावधी नमूद करणे कायद्याने बंधनकारक आहे. संबंधित वस्तू कोणत्या तारखेला उत्पादित झाली, ती किती दिवस टिकणार आहे, अंतिम मुदत कधीची आहे, याबाबत त्या वस्तूच्या वेष्टनावर सर्व बाबी नमूद करणे संबंधित उत्पादक कंपनीला बंधनकारक आहे. मात्र अनेक कंपन्या पाण्याची बाटलीवर असा उल्लेख करीत नाहीत, असा उल्लेख असला तरी तो अस्पष्ट किंवा वाचता येणार नाही, अशा पद्धतीने नमूद केलेले असते.
अनेक घरांमध्ये तर पाण्याच्या कॅन जात आहे. त्यांची शुद्धताही तपासली जात नाही. केवळ पाणी थंड आहे, म्हणून ग्राहक ते विकत घेतात. यातून ग्राहकांची लूट होत असून त्यांच्या आरोग्याशीही खेळले जात आहे. कोणत्याही हॉटेल, पानठेल्यावर आता एक लिटर पाण्याची बाटली किमान 20 रुपयांना मिळत आहे. अनेक शीतपेय निर्मिती कंपन्याही बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. स्थानिक कंपन्याही या व्यवसायात उतरल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन
बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागही उदासीन दिसत आहे. यातून ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाने पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासण्याची गरज आहे. त्या पाण्यातील विविध घटकांची तपासणी करणेही आवश्यक आहे. अनेक ठिकाणी केवळ पाणी थंड करून ते विकले जाते. त्यात कोणते घटक आहे, कोणते घटक नाहीत, याबाबत सामान्य ग्राहकांना माहिती नसते. ते पाणी आरोग्यास घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याचेच दिसून येत आहे़