दुष्काळाने पिढीच्या पिढी आपल्या मातीपासून परागंदा कागदी घोडे बाजूला ठेवत थेट उपाययोजना करा : दाहकता वाढली,पुढे कसं

0

Image result for दुष्काळ

जत,प्रतिनिधी : दुष्काळामुळे पिकांनी माना टाकल्याचे माहीत होते; परंतु खेडीपण माना टाकतात, हे नव्यानेच पुढे आले. रणरणते ऊन तेही आॅक्टोबरमध्ये. विहिरींनी तळ गाठला नाही तर त्या कोरड्याठाक. नदीनाले कोरडे. वातावरणात एक कायमस्वरूपी उदासीनता भरून राहिलेली. पारांवर, कट्ट्यांवर, मंदिरांच्या पडव्यांमध्ये लोक बसलेले; पण कुणाच्याही चेहऱ्यावर चैतन्य नाही की, आलेला दिवस ढकलण्यासारखे आयुष्य आहे.
जतेत केवळ पाण्याचा प्रश्न नाही. दिवाळीपूर्वीच एवढी दाहकता वाढली की, ग्रामीण भागातून पोट भरण्यासाठी आता स्थलांतर सुरू झाले आहे. तालुक्यांतील पुर्व भागातील गावांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. आता या खेड्यांमध्ये वृद्धांशिवाय कुणी नाही. सगळेच काम शोधण्यासाठी बाहेर पडले. पोट भरणे हा एकमेव उद्देश. आज ते गावातून उखडले गेले. त्यापैकी किती परत येणार, हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक दुष्काळाने अशी पिढीच्या पिढी आपल्या मातीपासून परागंदा केली आहे.
दुष्काळाची अशी दाहकता असताना सरकार आणि प्रशासन आकडेवारीचे निकष घासत बसले आहेत.दुष्काळ जाहीर झाला मात्र सुविद्या कागदावर आहेत.प्रशासनाकडून हालचाली शुन्यात आहेत. दिवाळीनंतर तेथेही पाणी नसणार. रोजगार तर आजच नाही. दिवाळीची आशा मावळली आहे. असे म्हणण्यापेक्षा शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी करपली आहे. सरकार दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करते. सरकार म्हणते दुष्काळसदृश स्थिती आहे, म्हणजे नेमके काय आहे. खरे तर दुष्काळ आहे की नाही, अशा दोन शब्दांतच स्पष्टता पाहिजे. आता दुष्काळ आहे; पण दुष्काळ नाही, असा शब्दच्छल चालू आहे. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा हा खेळ तसा जुना झाला; पण सरकार व प्रशासन दोघेही तो खेळण्यात रमले आहेत.त्यावर आरोपाच्या फेरीनंतर दुष्काळ जाहीर झाला आहे.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष काय? लोक देशोधडीला लागण्यास सुरुवात झाली, पेरलेले हाती काहीच पडले नाही, हाताला काम नाही, जनावरे मातीमोल किमतीत कोणी घ्यायला तयार नाही, चारा नाही, पाणी नाही, अशी परिस्थितीवर उपाययोजना गरजेच्या आहेत.लोकांच्या हाताला काम नाही आणि लोक काम मागत नाहीत. सरकारही रोजगार हमीची कामे देत नाही.जतेत उडीद, मुगाचे पीक गेले. याचे उत्पादन हेक्टरी 533 किलो व्हायला पाहिजे; पण यात 70 टक्के घट झाली म्हणजे शास्त्रीय भाषेत उणे उत्पादन. झालेला खर्चही भरून निघाला नाही. कडधान्याचा भाग हा जत; पण येथे यावर्षी पिकलेच नाही. याचा अर्थ भाव वाढणार, महागाई वाढणार, सरकारचे मंत्रीसुद्धा त्यांना वाढलेल्या घोषणा करतात.
दुष्काळ नवा नाही; पण आजवरच्या दुष्काळापेक्षा भीषण आहे. हा दुष्काळ ग्रामीण भागाची सामाजिक घडी उस्कटून टाकणार. खेडी ओस पडणार. ज्यावेळी जगण्याचा लढा तीव्र होतो, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा नात्यातला ओलावा आटतो. आता विहिरी आटल्या आणि त्याबरोबर परस्पर प्रेम, माया, आपुलकीला ओहोटी लागत आहे. माणूस मोडून पडणार आहे. तो पुन्हा उभा राहील एवढे निश्चित

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.