मुंबई : हाता तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवा उपक्रम हाती घेतला आहे. पक्षाचे तसेच संलग्न विविध संघटनांच्या पदाधिका-यांना तळागाळात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे सगळ्या पदाधिका-यांवर भाजप सरकारविरोधात जनमाणसांमध्ये वातावरण निर्मिती करण्याचा जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २६ सप्टेंबरपासून ऑक्टोबरचा पूर्ण महिना राज्यातील पाचही विभागात या पदाधिका-यांचे दौरे सुरु होत आहेत. या दौऱ्यामध्ये भाजप सरकारच्या शेतकरी आणि जनताविरोधी धोरणाबाबत व चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणार आहेत.डिसेंबर २०१७ पासून सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढली होती. त्यानंतर राज्यभर हल्लाबोलच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला होता. हल्लाबोल यात्रेला अभुतपूर्व यश मिळाले होते. शिवाय विधीमंडळाच्या अधिवेशनातही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारविरोधात झोड उठविली होती. सरकारविरोधात रान पेटविण्याची जबाबदारी आता राष्ट्रवादीचे फ्रंटल आणि सेलच्या प्रमुखांवरही सोपविली आहे.उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर-कोकण विभाग, पुणे जिल्हा, विदर्भ, मराठवाडा या विभागात फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख दौरे करणार आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या २६ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात सरकारच्याविरोधात रान उठवणार आहेत तर कोल्हापूर आणि कोकण विभागात सामाजिक न्यायविभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड हे ८ ऑक्टोबरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे हे १० ऑक्टोबरपर्यंत दौरा करणार आहेत. तसेच पुणे जिल्हयामध्ये अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक हे २ ते १० ऑक्टोबरपर्यंत दौरा करणार आहेत.