वाळू तस्करी बेफाम नुसता पर्यावरणाचा ऱ्हास नव्हे,लोकही दहशतीखाली : प्रशासनाची हिंमत होईना

0

जत,प्रतिनिधी:जगातील वाळवंटांत वाळूचे महाभयानक वादळे येतात आणि वाळूचे डोंगरचे डोंगर फेकले जातात. या वादळात टिकून राहणे अवघड असते. आपल्याकडे वाळवंट अजून झाले नाही. परंतु वाळूच्या वादळांनी धुमाकूळ घातला आहे. अर्थात ही वादळे वाळू तस्करांची आहेत. त्यांना रोखण्याची हिंमत प्रशासनाकडे दिसत नाही. तसे असते तर अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची हिंमत वाळू तस्करांमध्ये झाली नसती.वाळूच्या तस्करीने फक्त पर्यावरणाचाच र्‍हास होत नाही, तर लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. वाळू वाहतुकीस विरोध करणार्‍या ग्रामस्थांना मारहाण ही सततची गोष्ट झाली आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी कर्मचारी, विशेषतः महसूल कर्मचारी,अधिकार्‍यांवर बिनदिक्कत हल्ले केले जात आहेत. प्रशासन मात्र अधून-मधून एखादी मोठी कारवाई करते. त्यामुळे वाळू तस्करांवर वचक निर्माण होत नाही. यासाठी ग्रामस्थ, प्रशासन व पोलिसांनी संयुक्तपणे काम केले, तर या तस्करीला बर्‍याच प्रमाणात आळा बसेल. यासाठी सर्वांची इच्छाशक्ती मात्र हवी.प्रशासनाने धुमधड्यात गावागावत दक्षता समित्या स्थापन करून वाळू तस्करी रोकण्याचा केविलवाना प्रयत्न केला. मात्र दक्षता समितीतील काही सदस्य वाळू तस्करीत गुंतल्याने विरोध करायचा कोणी असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. कागदी घोडे नाचवणारे प्रशासन स्तंब्ध असल्याने सध्या जत तालुक्यातील संख,उमदी, कुडणूर, डोणसह अनेक वाळूयुक्त ओढा पात्रातून बेफाम वाळू तस्करी सुरू आहे.

Rate Card

वाळूचा प्रचंड उपसा, ही अलीकडील मोठी गंभीर बाब बनली आहे. त्यामुळे वाळू, पाणी व पाऊस, अशी साखळी असणारे हे पर्यावरणाचे घटक विस्कळीत झाले आहे.तालुक्याती बोर नदी, अनेक ओढापात्रे अतिरिक्त वाळू उपशामुळे कोरड्या पडली आहेत. सततच्या उपशामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. मात्र त्याचे कोणाला सोयरसुतक नाही. उलट नद्यांना पाणी असतानाही वाळू तस्करांकडून वाळू उपसा सुरूच असतो. आता शहरातूनच नव्हे, तर ग्रामीण भागातही बांधकामांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे वाळूला सोन्याचे मोल आले आहे. वाळूचे भावही प्रचंड आहेत. त्यामुळे वाळू तस्करांचे उखळ पांढरे झाले आहे. वाळूचे थर खाली खाली जात आहेत, तर वाळू तस्कर कोणत्याही थराला जात आहेत. हे थांबविणे अवघड होत चालले आहे, ते केवळ प्रशासनाच्या बोटचेपे धोरणामुळे. महसूल व पोलिसांची संयुक्त मोहीम या तस्करीला काही प्रमाणात रोखू शकेल. पण त्यात सातत्य दिसत नाही. महसूलची कारवाई होते, पण त्यात सातत्य नाही. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये दहशत निर्माण होत नाही. उलट त्यांचीच दहशत ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. वाळूचे लिलाव करून प्रशासन काही प्रमाणात त्यात नियमितता आणण्याचे काम करते. परंतु लिलावापेक्षा जास्त वाळू उपसा होतो. त्याची कोणी चौकशीही करीत नाही. हपापाचा माल गपापा, असे धोरण सध्या सुरू आहे.
वाळू तस्करीतून फक्त हल्लेच होत नाही, तर पर्यावरणाला मोठा फटका बसण्याची शक्यात आहे. त्याचे दुष्परिणाम भयानक होणार आहे. पूर्वी गावच्या ओढे,नद्यांना पाणी असायचे. आता या ओढे,नद्या कोरड्यातर पडल्या आहेत. परंतु वाळू उपशामुळे हजारो खड्डे पडल्याने त्यांचे मार्ग बदलले आहेत. यातून गावातील विहिरींचे पाणीही गायब झाले आहे. त्यामुळे विहीर बागायती क्षेत्रही धोक्यात आले आहे. गावांना पिण्याचे पाणीही मिळणे अवघड होऊ लागले आहे.ओढे, नदी काठची झाडी पाण्याअभावी नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे गावोगावचे परिसर आणि मोठ्या नद्याकाठाच्या गावांची संस्कृतीचा नष्ट होण्याची भीती आहे. हे थांबवणार कोण आणि वाळू तस्करांचा नंगानाच केव्हा थांबणार?  असा प्रश्‍न जनतेला पडला आहे. पुढारी वर्गाचे आणि वाळू तस्करांचे हितसंबंध असल्यामुळे वाळू तस्कर शिरजोर झल्याचे सांगितले जाते. वाळू तस्करीतून गुंडांच्या टोळ्याही तयार झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून पिस्तूल, तलवारीचा वापर या टोळ्यांकडून केला जाऊ शकतो. जत तालुक्यात तर गेल्या  काही वर्षांत या टोळ्यांनी अनेकदा एकमेकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. त्यातून अनेक तरुणांकडे घातक शस्ञे सापडत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाई स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाळू तस्करीमुळे केवळ पर्यावरणच नाही, तर गावोगावाचे जनजीवनही भयाच्या सावटाखाली आले आहे. गावच्या ओढे,नदीचे हक्कदार ग्रामपंचायत असते. काही वेळा या ग्रामपंचायती वाळू तस्करीला विरोधही करतात. परंतु हे तस्कर त्यांना जुमानत नाहीत. हा सर्व प्रकार मोठी चिंता निर्माण करणार आहे. हे संकट टाळण्यासाठी सर्वच लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे, हे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.