जत | पुन्हा पाणी टंचाईच्या जबड्यात,तीव्र उन्हाच्या चटक्याने पुर्व,दक्षिण,उत्तर भागात पाणी मागणी वाढू लागली | www.sankettimes.com

0

जत, प्रतिनिधी:वाढते तापमान, बेबंद पाणी उपसा, भूगर्भातील घटलेला पाणीसाठा यामुळे जिल्ह्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील जत तालुक्यातील जवळपास पन्नायवर गावे टंचाईच्या चटक्यांनी हैराण झाले आहेत. तलावातील पाणीसाठा घटला आहे. पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. पिके होरपळू लागली आहेत. जनावरांचे हाल सुरू आहेत. म्हैसाळ पाणी योजनेतून पाणी सतत सोडणे आवश्यक असताना शासन व प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळा कडक जाणार, अशी स्थिती आहे.मागील वर्षी जत तालुक्यावर वरूणराजाची कृपा झाल्याने यंदा तालुका महादुष्काळाच्या खाईतून बाहेर आला आहे. मार्च महिना संपला तरीही तालुक्यात अद्याप एकाही ठिकाणी टँकर सुरू झाला नाही. असे असले तरी सध्या तालुक्यातील 27 गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शासनाने चालू वर्षासाठी 1 कोटी 49 लाखांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. पण तालुक्यात टँकर सुरू करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे.

तालुक्याने मागील काही वर्षे सातत्याने महादुष्काळ अनुभवला. काही गावांना बारमाही टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. काही अपवाद वगळता सर्व गावांना टँकर सुरू होते. यंदाचे चित्र मात्र समाधानकारक आहे. मार्चपर्यंत तालुक्यात एकाही ठिकाणी टँकर देण्यात आला नाही. एप्रिल, मे या दोन महिन्यात मात्र टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. टँकरग्रस्त गावांमधील पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. तलाव कोरडे पडू लागले आहेत, पाणी योजनांचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागाचे चित्र काही प्रमाणात बदलले आहे. मागील वर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामधून कुंभारी, कोसारी, बागेवाडी, गुळवंची, कंठी, बिरनाळ, शेगाव, तिप्पेहळ्ळी, बनाळी, वाळेखिंडी या भागातील तलाव भरून घेण्यात आले होते. तो पाणीसाठा आता संपुष्टात आला आहे. कृष्णा नदीच्या पाण्यावर शेतकर्‍यांनी फळबागा व नगदी पिके घेतली आहेत. यावर्षी पाणी सोडण्याची चिन्हे दिसत नसल्याने पश्‍चिम भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही या भागात गंभीर झाला आहे.

Rate Card

टंचाईग्रस्त गावे :

तालुक्यातील काही गावांना नेहमीच उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. त्यामध्ये उमदी, डफळापूर, बिळूर, तिकोंडी, मुचंडी, माडग्याळ, गुड्डापूर, उमराणी या मोठ्या गावांचाही समावेश आहे. प्रशासनाने टंचाईमध्ये 27 गावांचा समावेश केला आहे. त्यामध्ये जिरग्याळ, मिरवाड, सिंगनापूर, कुडनूर, लकडेवाडी, अमृतवाडी, सनमडी, मायथळ, टोणेवाडी, वज्रवाड, बसर्गी, खिलारवाडी, येळदरी, गूगवाड, सिंदूर, एकुंडी, वळसंग, बागलवाडी, बेळुंखी, बाज याही गावांचा समावेश आहे. उमदी, डफळापूर या गावच्या वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू करण्याची मागणी आहे. अमृतवाडी या गावाची अनेक दिवसांपासून टँकरची मागणी आहे. तर बागलवाडी या गावाने विहीर अधिग्रहणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दिला आहे. प्रशासनाने  टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करावा, अशी जनतेची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.