जत | पाणीदार गावासाठी आंवढीकर झपाटले दररोज 500 वर नागरिकांचे श्रमदान बदलवणार आंवढीचे चित्र | www.sankettimes.com

0
2

जत, प्रतिनिधी – वेळ पहाटे पाचची. आंवढी (ता. जत) येथील 500 ते 600 ग्रामस्थ सकारात्मक ऊर्जेने घराबाहेर पडतात. अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगर चढतात. हातात खोरे, टिकाव, पाटी घेऊन तब्बल दोन तास अंगाला घाम फुटेपर्यंत राबतात आणि मगच डोंगराखाली उतरतात. गत आठ दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे. जतपासून पंचवीस किलोमीटरवर डोंगर कुशीत वसलेल्या आंवढी गावात दर उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कायमचीच संपवायची, असा निर्धार करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा उपक्रम श्रमदानातून सुरू आहे.उन्हाळ्यात येथे भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी आणि विशेषत: तरुणांनी पुढाकार घेतला असून श्रमदानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा क्रियाशील प्रयोग राबविण्यासाठी धडपड सुरू आहे. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच गावातील तलाव आणि विहिरीतील पाणी आटते.गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून तरुणांनी येथे श्रमदान सुरू केले आहे. कष्ट करणाऱ्या ग्रामस्थांना आता हवी आहे ती मदत. कारण पावसाळ्यापूर्वी तलावाचे गाळ काढण्याची गरज आहे. त्यासाठीच खर्चही मोठा आहे. श्रमदानावर मर्यादा येत आहेत. अद्ययावत यंत्रांचीही आवश्‍यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व या क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांनी मदत म्हणून या गावाला सहकार्य करावे व चांगल्या उपक्रमात हातभार लावावा, अशी भावना येथील ग्रामस्थांची आहे.200 हेक्‍टर डोंगरावर पावसाचे पाणी जिरविण्याचे ध्येयगावाच्या उत्तरेस सुमारे 200 हेक्‍टर डोंगरावर पडणारा पाऊस डोंगरावरच जिरविण्याच्या ध्येयाने ग्रामस्थ कामाला लागले आहेत. डोंगराच्या ओघळीत असणाऱ्या जुन्या बंधाऱ्यांची पाण्याची पातळी एकच कशी राहील, याचे तंत्रज्ञानही आत्मसात करून त्या पद्धतीने काम केले. 

जत तालुक्यातील आंवढी येथे श्रमदान करत असलेले हे नागरिक झपाटून काम करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here