डफळापूर | कुडणूर,शिंगणापूर ओढापात्र वाळू तस्करीने व्यापले |www.sankettimes.com

0

कर्नाटक सिमाभाग,जत पश्चिम भागातील गावात दररोज वाळूच्या 10 वर खेपाचा धंदा ; जत पश्चिम भागाचे वाळू तस्करीचे कोठार

Rate Card

जत,प्रतिनिधी: वाळू उपशावर बंदी असूनही जत तालुक्यातील कुडणूर शिंगणापूर ओढापात्रातून चोरट्या पध्दतीने वाळूउपसा आणि वाहतूक सुरू आहे. अवैध वाळू रोखण्याच्या नावाखाली महसूल मंडल,तलाठी,कोतवाल स्तरावर हप्तेखोरी होऊ लागल्यामुळे वाळू व्यावसायिकांची वाळू तस्करी सुलाट सुरू आहे. या वाळू चोरांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना कारवाईचे अधिकार दिले आहेत.तरीही वाळू चोरी सुरूच आहे. वाळूवाले चोरावर मोर झाल्याचे जत तालुक्यातील चित्र आहे. कुडणूर ओढा पात्र वाळू तस्कराचे कुरण आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून वाळू तस्करी थांबल्याचे चित्र होते मात्र हा आशावाद फेल ठरला आहे. कुडणूर शिंगणापूरच्या आसपासच्या ओढा पात्रातून वाळू तस्करी राजरोपणे चालू  असल्याचे तेथील ग्रामस्थ सांगतात. वाळू तस्कर नजिकच्या गावकऱ्यांना दमबाजी करून वाळू चोरी करत असल्याचे आरोप होत आहेत.वाळू व्यावसायिकांकडून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार अलीकडे खूपच वाढले आहेत.  प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची लाचखोरीही तितकीच कारणीभूत आहे. अवैध वाळू वाहतूक व उत्खननावर कारवाईचे अधिकार तहसीलदारांना आहेत. मात्र तहसिलदारांची गाडी कारवाईसाठी बाहेर पडताच वाळू तस्करांना मँसेज पोहचविण्याचे काम खालचे काही कर्मचारी इमानइतबारे करत आहेत. त्यामुळे कुडणूर शिंगणापूर ओढापात्रातून वाळू तस्करीवर कारवाई नाममात्र होत आहे. कवठेमहांकाळ व जतच्या सिमेवर असणाऱ्या या ओढापात्रातून वाळू ढिगारे रिकामे झाले आहेत. वाळू काढल्यामुळे बोडका ओढा पात्र बघण्याची वेळ आली आहे. मुठभर वाळू तस्करांच्या सुखासाठी लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.येथील वाळूवर कारवाईसाठी महसूल प्रशासनही थोडा ढिलेपणा दाखवत आहे. तालुक्यातील कुडणूर शिंगणापूर पात्रातून मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू तस्करी सुरू आहे. इतत्र वाळू उपसाही बंद असल्याने चोरट्या पध्दतीनेच वाळू उपलब्ध केली जात आहे. अशा वेळी या चोरटा वाळूउपसा आणि वाहतुकीवर कारवाईचे काम महसूल विभागाकडून होणे अपेक्षित आहे. सध्यातरी वाळू तस्करीवर महसूल पथकांच्या माध्यमातून कारवाई झाल्यासच वाळू चोरी थांबेल व बुडणारा महसूलही वसूल होणार आहे.

राजकीय पदाधिकारी वाळू तस्करीत ?जत तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या आसपास फिरणारे अनेकजण वाळू तस्करीत गुंतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डफळापूर परिसरात दररोज बेधडक वाळूच्या खेपा ओतल्या जात असताना त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष का होते हे गुलदस्त्यात आहे.जत महसूल विभागाच्या डफळापूर मंडल स्तरावरच्या यंत्रणेकडे संशयाने पाहिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.