चित्रपट ” व्हाटस अप लग्न ” प्रामाणिक प्रयत्न ,,
लग्न हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, प्रत्येकाला लग्न व्हावे असे वाटत असते त्यापेक्षा घरच्या मंडळीना आणि आपल्या नातेवाईकांना त्याची उत्सुकता अधिक असते हा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. कोणाचे लग्न कसे, आणि कोणाबरोबर जुळेल हे सांगता येणे कठीण आहे. लग्न म्हंटले कि मग मुलीकडची मंडळी वधूवर सूचक संस्थेमध्ये नाव नोंदणी सुरु करतात. आजकाल सगळे कसे ऑन लाईन झालेलं आहे. ह्या आजच्या वास्तववादी युगात कोणाचे व्हाटस अप लग्न जुळले तर आश्चर्य मानायला नको. अशीच मध्यवर्ती कल्पना घेऊन ” व्हाटस अप लग्न ” ची निर्मिती फिनक्राफट मिडिया एंड एन्टरटेनमेंट प्रा, ली. या चित्रपट संस्थेने केली आहे. प्रस्तुती जाई जोशी आणि व्हिदिओ पैलेस ने केली असून निर्माता दिग्दर्शक विश्वास जोशी हे आहेत. कथा अभिराम भडकमकर, विश्वास जोशी यांची तर पटकथा – संवाद मिताली जोशी, अश्विनी शेंडे, विश्वास जोशी यांनी लिहले आहेत. छायाचित्रण सेतू श्रीराम यांचे असून अश्विनी शेंडे क्षितीज पटवर्धन यांच्या गीतांना निलेश मोहरीर, ट्रोय आरीफ यांनी संगीत दिले आहे.
या मध्ये वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विध्याधर जोशी, इला भाटे, स्नेह रायकर, अश्विनी कुलकर्णी, विनी जगताप, सविता मालपेकर, सुनील बर्वे या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.
आकाश प्रधान ( वैभव तत्ववादी ) हा एका मोठया नामवंत आयटी कंपनी मध्ये नोकरीला असतो, आपले काम प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने करणे इतकेच त्याला माहित असते, आकाश हा एकदम टापटीप व्यवस्थित रहात असतो, जी वस्तू ज्या जागी असेल त्याच जागी ती दिसायला आणि असायला हवी हा त्याचा कटाक्ष असतो. एकटाच रहात असल्याने चहा कॉफी करताना सुद्धा सगळ्याचे प्रमाण ठरलेलं मोजून–मापून करीत असतो, एक दिवस त्याला ऑफिसच्या कामा निमित्ताने नाशिक ला जावे लागते कंपनीने बुक केलेल्या गाडीमध्ये अश्विनी { प्रार्थना बेहरे } नावाची मुलगी येऊन बसते ती एक कलाकार आहे,, तिला सुद्धा नाशिकला जायचे असते, हि अश्विनी टापटीप – व्यवस्थित कधीच नसते, आई वडिलांची एकुलती एक असल्याने लाडात वाढलेली असते, घरकाम तिला कधीच येत नाही,गाडीत गाणी ऐकण्यासाठी ती ड्रायव्हर ला पेन ड्राईव्ह देते, अश्विनीचे घर आल्यावर ती उतरून घरी जाते आणि आकाश आपल्या ऑफिसला निघून जातो. घरी आल्यावर अश्विनीला आठवते कि आपला पेन ड्राईव्ह गाडीमध्ये विसरलो आणि त्यामुळे ती आकाश ला फोन करून भेटायचे ठरविते, आणि दोघे भेटतात,
अश्विनीची रेवती मावशी हि अश्विनीच्या मागे लग्न करण्याचा तगादा लावत असते, अश्विनीने आपले नाव एका वधूवर संस्थेकडे नोंदविलेल असते त्याच ठिकाणी आकाशच्या आईने आकाश चे नाव नोंदविलेल असते अश्विनीच्या पाहण्यात तो येतो आणि ती सहज त्याला होकार कळवून टाकते, दोघे पुन्हा एकत्र येतात, कालांतराने त्यांचे रजिस्टर पद्धतीने लग्न होते, त्याचवेळी अश्विनीला एका डेलीसोप मध्ये काम करण्याची संधी मिळते, आकाश हा आपल्या ऑफिसच्या कामात बिझी होतो अश्विनी डेलीसोप मध्ये काम करते, दोघांची कामे वेगवेगळ्या वेळी असतात, दोघेही ठरवतात कि आपण आपले करिअर जपायचे, कामाला महत्व द्यायचे त्यामुळे त्यांच्यामध्ये मेळ बसायला अडचण येते, त्यांचे संभाषण हे ” व्हाटस अप ” वर सुरु होते, एकमेकाशी गप्पा नाहीत, कित्येक दिवसात दोघांनी एकमेकांना जागे असलेलं बघितलं नाही, एकमेकाला वेळ न दिल्याने त्यांच्यातील ताण तणाव वाढत जातो, त्या दोघांना आधुनिक तंत्रज्ञानमुळे सर्व वस्तू घरपोच येतात, पण तरीही त्यांना एकमेकासाठी वेळ देण्यासाठी वेळच मिळत नाही. दोघेही एकाच घरात राहून सुद्धा स्वतंत्रपणे आयुष्य जगत असतात. शेवटी नेमके काय होते ते सिनेमात समजू शकेल.
वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांनी आपापल्या भूमिकेतील ” प्रेम, चिडचिड, आपुलकी, जिव्हाळा, ताटातूट , अश्या विविध छटा उत्तमपणे सादर केल्या आहेत, बाकीच्या कलाकारांची साथ उत्तम लाभली आहे. काही ठिकाणी चित्रपट संथगतीने जातो परंतु एकदा पहायला हरकत नाही.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७






