जत तालुक्यात कडकडीत बंद भिमा कोरेगाव प्रकरण गावापर्यत :आंबेडकरी अनुयायांनी आक्रमक
जत,प्रतिनिधी:भीमा कोरेगाव विजयदिन साजरा होत असताना सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद जत शहरासह तालुक्यात उमटले.जतशहरासह तालुक्यातील प्रमुख गावातील कडकडीत बंद पाळण्यात आला. सांगलीतील दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. तणावाची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

पेरणेफाटा (ता. हवेली) येथे सोमवारी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्यांवर एका गटाने दगडफेक केली होती. यानंतर या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे बुधवारी सकाळपासून पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता बाजारपेठा, सरकारी व खाजगी वाहतूक सेवा, शैक्षणिक संस्था व अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांनी सकाळीच मोर्चे काढून सुरू असलेली काही दुकाने बंद करण्याचे आवाहन केले तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती. काही ठिकाणी तणावाचेही वातावरण निर्माण करणाऱ्या किरकोळ घटना घडल्याचे वृत्त आहे. जत येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. जतच्या बसस्थानकावर अनेक प्रवासी सकाळच्या वेळेस अडकून पडले होते.जत शहरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारीही तालुक्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
