आतापर्यंत ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर*
*प्रत्येक पात्र शेतकऱ्यास लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरु राहणार*
*- मुख्यमंत्री*
*· पुर्वीच्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी टाळल्या*
*· बोगस खातेधारकांना रोखण्यात यश*
मुंबई, दि. १४ : केंद्र शासनाने २००८ मध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी राबविलेल्या योजनेसंदर्भात कॅगच्या तसेच इतर माध्यमातून पूढे आलेल्या त्रुटींची पुनरावृत्ती चालू कर्जमाफी योजनेत होऊ नये, एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, बोगस खातेधारकांना योजनेच्या लाभापासून रोखता यावे आणि योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या योजनेतून आतापर्यंत ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली असून त्यासाठीचे २० हजार ७३४ कोटी रुपये बँकांना पाठविण्यात आले आहेत. अर्ज केलेल्या उर्वरीत शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करुन त्यांनाही कर्जमाफी देण्यात येईल. राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सत्ताधारी पक्षाच्या वतीने डॉ. अनिल बोंडे, सुनिल प्रभू, राजेंद्र पाटणी, हर्षवर्धन जाधव आदींनी नियम २९३ अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मध्ये राबविण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेत कॅगने ३९.४३ टक्के प्रकरणांमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही अनियमित प्रकरणे सुमारे ४ हजार कोटी रुपयांची होती. एकाच कुटुंबांतील अनेक सदस्यांनी लाखो रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचे दिसले. हे पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एका कुटुंबातील पित्याला ३८ लाख रुपयांची तर त्याच्या मुलास ९ लाख ११ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाल्याचे नावासह सांगितले. बँका आणि सहकारी सोसायट्यांनीही त्यावेळी अनियमितता केल्याचे पुढे आले. हे सर्व रोखण्यासाठीच सध्या राबविल्या जात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पूर्णत: पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. शिवाय या योजनेच्या लाभासाठी जमिनीची मर्यादा ठेवण्यात आली नाही. या योजनेसाठी सुमारे ७७ लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. दुबार अर्ज केलेले, योजनेसाठी पात्र नसलेले, आयकर भरणारे यातून कमी झाले. उरलेल्या ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीचे काम सुरु करण्यात आले. त्यापेकी ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली असून त्यासाठीचे २० हजार ७३४ कोटी रुपये बँकांना पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही वेगात सुरु असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही कार्यवाही सुरु राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले नाहीत पण ते पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांनाही अर्ज भरुन घेऊन कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
२००८ मधील कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी २८ महिन्यांचा कालावधी लागला होता. पण त्या तुलनेत चालू कर्जमाफी योजनेची गतीने आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुर्वी राबविल्या गेलेल्या २० हजार रुपये लाभाच्या दुसऱ्या कर्जमाफी योजनेत मुंबईतील १ लाख ८३ हजार शेतकऱ्यांना २८७ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. पण त्या तुलनेत राज्यातील आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त २८५ कोटी रुपये मिळाले, याकडेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. पुर्वीच्या योजनांतील या त्रुटी टाळून प्रत्येक पात्र शेतकऱ्यास कर्जमाफी मिळावी तसेच शासनाच्या प्रत्येक पैशाचा सुयोग्य वापर व्हावा यादृष्टीनेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही पूर्णत: पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली आणि पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकला, असे ते म्हणाले.
इर्शाद बागवान / डिएलओ
