तुम्ही मोगलांचा इतिहास वगळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम नव्या पिढीस कसा सांगणार ?; माजी मंत्री आ.जयंतराव पाटील

0

बोरगाव,वार्ताहर;

         तुम्ही मोगलांचा इतिहास वगळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम नव्या पिढीस कसा सांगणार ? असा थेट सवाल माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राज्य शासनास केला. राज्य शासनाचा पाठ्य पुस्तकातून मोगलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

         बोरगाव (ता.वाळवा) येथे सेवा निवृत्त मुख्याध्यापक स्व.विलासराव पाटील (दादासर) यांचा पहिला स्मृतीदिन व त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या “स्नेह विलास स्मृतीगंध” गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. विट्याचे माजी आमदार सदाभाऊ पाटील,माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे,राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, विष्णुपंत शिंदे,एस.टी.पाटील (भाऊ),संचालक कार्तिक आप्पा पाटील,पै.विकासआण्णा पाटील प्रामुख्याने  उपस्थित होते. प्रारंभी स्व.दादासरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

           आ.पाटील पुढे म्हणाले,जर तुम्ही अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे,मिर्झा राजे जयसिंहांचे स्वराज्यावर आलेले संकट,आग्र्याहून सुटका असे कित्येक प्रसंग,घटना तुम्ही पाठ्यपुस्तकातून वगळल्या,तर नव्या पिढीस महाराजांचा जुलमी अन्यायाविरुद्धचा संघर्ष कसा सांगणार? महाराजांचा इतिहास वगळण्याचे धाडस यांच्यात नाही,म्हणून हे कुटील डाव खेळत आहेत. समाजातून मंदिरास कोटयावधीच्या देणग्या दिल्या जातात,मात्र त्याच तत्परतेने माणूस घडविणाऱ्या ज्ञान मंदिरांना पैसे दिले जातात का? सध्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असून समाजाने या क्षेत्रात खऱ्या अर्थाने गुंतवणूक करायला हवी. दादासरांनी झोकून देवून ज्ञान दान केले. त्यांनी कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. त्यांचा आदर्श घेवून नवी पिढी काम करेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

         सदाभाऊ पाटील म्हणाले,सोनबा गुरुजी व तात्यांच्या कुटुंबाने विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. दादासरांनी तो वारसा जपला. ते मित भाषी होते. त्यांनी अनेकांना योग्य सल्ला दिला असून ते अनेकांच्या मदतीस धावून गेले आहेत. माझ्या राजकीय जीवनात पहिल्या पुण्यस्मरणास इतकी माणसं प्रथमच पाहतो आहे. स्व.बापू व त्यांच्यानंतर आपल्यावर  निष्ठा वाहणाऱ्या या कुटुंबास अधिक प्रेम द्या,असे आवाहन आ.पाटील यांना केले.

Rate Card

        भगवानराव साळुंखे म्हणाले, दादासर व एस.टी.पाटील (भाऊ) यांनी मला शिक्षक चळवळीत मोलाचे सहकार्य केले आहे. याप्रसंगी दादासरांचे सहकारी तात्यासाहेब यादव,वासंती कांबळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. प्रकाश डूबल यांचा सत्कार करण्यात आला.

           या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,सभापती सचिन हुलवान,उपसभापती नेताजीबाबा पाटील,माजी जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवकाध्यक्ष संग्राम पाटील,माजी संजय पाटील, बी.डी.पवार,कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे,माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील,महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम,पलूसचे नगराध्यक्ष राजेंद्र सदामते यांच्यासह बोरगाव व परिसरातील पदाधिकारी ,मान्यवर कार्यकर्ते, पै-पाहुणे,ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           उदयनाना पाटील (सर) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी सरपंच प्रकाश वाटेगावकर यांनी आभार मानले. विनय देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- बोरगाव येथे स्व.विलासराव पाटील (दादा सर) यांच्या स्मरणार्थ “स्नेह विलास” या स्मृतिगंध गौरव ग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील,भगवान पाटील, माणिकराव पाटील,पै.विकासआण्णा पाटील व मान्यवर.

सदाभाऊंचे एकतर्फी प्रेम।

        सदाभाऊ पाटील म्हणाले, राजकीय स्थित्यंतरे  काहीही घडो. मात्र आम्ही तुमच्यावर एकतर्फी प्रेम करतो. तुम्ही आमच्याकडे बघा,नाहीतर न बघा. मी यापूर्वीही सभांमधून बोललो आहे. आम्ही घाटावरचे असलो,तरी आता एकाच पाणवठ्यावर पाणी पितो. आमचा दुष्काळी भाग असला,तरी बागायत वाढायला लागले आहे. आता आमच्या भागाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.