नाटक : पती गेले ग काठेवाडी,, देखणी नाटयकृती,,
सुबक हर्बेरियम ह्या लोकप्रिय नाटयसंस्थेने ह्यापूर्वी लोकप्रिय असलेली जुनी गाजलेली नाटके रसिकांच्या साठी फक्त काही मोजके प्रयोग करून सादर केली, आजच्या या नवीन पिढीला जुन्या गाजलेल्या लेखकांच्या लोकप्रिय नाटकांची ओळख व्हावी आणि त्याचा आनंद घेता यावा ह्या हेतूने हर्बेरियम २ तर्फे ” पती गेले ग काठेवाडी ” हे नाटक सादर करण्यात आले. निर्माते सुनील बर्वे हे आहेत.
पतिव्रता ह्या शब्दाचा अर्थ मोठा आहे, एकनिष्ठेने आपले सर्वस्व आपल्या पतीच्या चरणी स्त्री अर्पण करते, काही हि झालं तरी आपले शील भ्रष्ट होऊ देत नाही, ते एक व्रत असत आणि हे व्रत पार करताना तिला अनेक अडचणींना / संकटाना सामोरे जावे लागते. स्त्रीया ह्या मुळातच हुशार आणि चतुर असतात, हि मध्यवर्ती कल्पना पती गेले ग काठेवाडी ह्या नाटकात सुप्रसिद्ध कथाकार आणि नाटककार व्यंकटेश माडगूळकर यांनी मांडली आहे, ह्या नाटकाचे वैशिष्ठ म्हणजे ह्यामध्ये लोकनाटय आणि पारंपरिक नाटक ह्याचा सुंदर मिलाप त्यांनी घडवून आणलेला आपल्याला पाहिला मिळतो. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघ यांनी १९६८ मध्ये सादर केला होता, त्यावेळी त्याचे दिगदर्शन आणि संगीत सुधा करमरकर यांनी केलं होत.त्यानंतर आता ह्या नाटकाला दिगदर्शन विजय केंकरे यांचे लाभले असून आता नवीन कलाकारांच्या संचात हे नाटक सादर केलं आहे. यामध्ये निखिल रत्नपारखी, ललित प्रभाकर, अभिजित खांडकेकर, मृणमयी गोडबोले, ईशा केसकर, हे कलाकार असून सोबतीला धनंजय म्हसकर, सिद्धेश जाधव, धम्मरक्षित रणदिवे, संतोष साळुंके, श्रीकांत वावदे, हे आहेत, या नाटकाची संगीताची महत्वाची बाजू राहुल रानडे यांनी सांभाळलेली आहे, वादक कलाकार अमित पाध्ये, वेदांग लेले, संदेश कदम, मयूर जाधव, हे असून आकर्षक देखणे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे, प्रसंगाला साजेशी प्रकाश योजना शीतल तळपदे यांची तर प्रसंगानुरूप वेशभूषा मंगल केंकरे यांनी सांभाळलेली आहे. नाटकाची निर्मिती सुनील बर्वे यांची असून सूत्रधार श्रीपाद पद्माकर आणि व्यवस्थापन प्रकाश सावंत, नितीन नाईक यांचे आहे.
नाटकाच्या सुरवातीला पारंपरिक पद्धतीचा सूत्रधार सामोरा येतो आणि पाठोपाठ शाहीर येतो आणि दोघे मिळून नाटकाचे कथानक पुढे नेतात. हि कथा एका सुभेदाराची, आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या पत्नीची म्हणजेच सर्जेराव शिंदे आणि त्याची पत्नी जानकीची आहे. पेशवाईच्या कालखंडातील हा सुभेदार वसुली साठी काठेवाडला जातो त्यावेळी त्याच्या घरी पत्नी जानकी तिच्या सखी बरोबर अर्थात मोहना बरोबर राहणार असते, सर्जेराव चौथाईच्या वसुलीसाठी मोहिमेवर निघतो त्यावेळी तो आपल्या पत्नीला काही अटी घालतो, त्या अटींमध्ये तिने एकही पैसा खर्च न करता आरसे महाल बांधावा,आपल्यासाठी सवत आणावे, आणि पुत्ररत्नाला जन्म द्यावा,अश्या ह्या विचित्र अटी तिने मी मोहिमेवरून येण्यापूर्वी पूर्ण कराव्यात असे सांगून जातो. त्यावेळी जानकी आपल्यादारी असलेल्या बकुळीच्या फुलांचा ” गजरा / तुरा ” त्यांच्या पगडीला बांधते आणि ” तुरा ” जो पर्यंत ताजा आहे तो पर्यंत मी सुखरूप आहे असे समजावे असे ती सांगते. जानकी हि एकनिष्ठ पतिव्रता असते तशीच ती चतुर हि असते. आपल्या पतिराजांच्या सर्व अटी ती मान्य करते, सुभेदार काठेवाड ला पोहोचतो त्यावेळी तेथील राजा जोरावरसिंह ला जेंव्हा कळते कि सुभेदाराची पत्नी जानकी एकटी आहे त्यावेळी तिचे पावित्र्य नष्ट करावे ह्यासाठी तो आपला दिवाणजी ह्याला सुभेदाराच्या घरी पाठवतो, सुभेदारांनी दिलेल्या अटींचे पालन करून जानकी त्या सर्व अटी कश्या पूर्ण करते हे जाणून घेण्यासाठी नाटक पाहायलाच हवं. हे सारे नाटयमय रीतीने नाटककार व्यंकटेश माडगूळकर यांनी गुंफलं आहे. लोकनाटय / पारंपरिक नाटय ह्याचे उत्तम मिश्रण ह्या नाटकात आहे.
दिगदर्शक विजय केंकरे यांनी हे नाटक अत्यंत बंदिस्तपणे सादर केलं आहे. राहुल रानडे यांनी दिलेलं नाटकाचे संगीत हे नाटकाला उठाव आणणारे असून त्यामध्ये त्यांनी गुजरात मधील पारंपरिक संगीताचा वापर छान केला आहे. धनंजय म्हसकर ( सूत्रधार ) सिद्धेश जाधव ( शाहीर ) यांनी आपली कामगिरी उत्तम सांभाळलेली आहे. या बरोबर वादक कलाकारांना विसरून चालणार नाही, नेपथ्यामधील बदल हा सुद्धा कुठेही प्रसंगाला बाधा न आणता केला आहे. अभिजित खांडकेकर यांनी सर्जेराव ची भूमिका मनलावून केली असून दिवाणजींच्या भूमिकेत ललित प्रभाकर यांनी आपल्या भूमिकेला योग्यतो न्याय दिलेला आहे,मृणमयी गोडबोले हिने जानकीची भूमिका आणि ईशा केसकर हि मोहनची भूमिका छान सादर केली आहे. त्याच प्रमाणे निखिल रत्नपारखी यांनी जोरावरसिंह ची भूमिका उत्तम रंगवली आहे.
एकंदरीत हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते, नाटकाचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७