सर्वाना विश्वासात घेवून गावाच्या विकासाला एक निश्चित आकार देण्यासाठी कामाला लागावे,माजी ग्रामविकास मंत्री आ.जयंतराव पाटील

0

इस्लामपूर, प्रतिनिधी ;

         प्रत्येक सरपंचांनी आपले गांव कसे असायला हवे? याचा एक आराखडा तयार करून सर्वाना विश्वासात घेवून गावाच्या विकासाला एक निश्चित आकार देण्यासाठी कामाला लागावे,असा सल्ला माजी ग्रामविकास मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे दिला. सरपंचांनी महिन्यातून किमान एक दिवस तरी गल्ली-बोळातून फिरावे. म्हणजे कामे सुचतील. लोक आपल्याशी संवाद साधतील,असेही त्यांनी सुचविले.

           येथील श्री.सर्जेराव यादव प्रतिष्ठान व वाळवा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने सर्जेराव यादव मल्टिपर्पज हॉलमध्ये “चला,गाव  घडवूया” ही एक दिवसाची ग्राम परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी वाळवा तालुक्यातील नूतन सरपंचांचा आ.पाटील यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम गाथेचा संदेश असणारे स्मृती चिन्ह व रोप देवून जाहीर सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव यादव, आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील, सभापती सचिन हुलवान,उपसभापती नेताजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत,मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

          आ.पाटील पुढे म्हणाले,ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी कोणाला मते दिली?, कोण कुठे गेला? हे विसरा. आता गावाच्या विकासासाठी गावातील सर्व गट-तट  एकत्र आणण्याची जबाबदारी सरपंचाची आहे. सद्या ग्राम पंचायतीना थेट निधी मिळत असल्याने,तुम्हास गावाचा विकासाचा निश्चित आराखडा तयार करावा लागेल. यामध्ये गावाच्या मूलभूत गरजा सोडविण्यास प्राधान्य द्या. गावातील सर्वाना विश्वासात घेतल्यास रोजगार हमीतून गावातील रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी येवू शकतो. दर महिन्याच्या बैठकीनंतर गावातील किमान 5 कुटुंबांना बोलावून त्यांचे प्रश्न समजावून घ्या,ते सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या तालुक्यात आलेल्या धरणग्रस्तांना गावाच्या प्रवाहात सामावून घ्या. गावा-गावातील माणूस उभा करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असते. त्यासाठी डोळस सरपंच बना.

          औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी गावाच्या विकासाला गती देण्यासाठी काय-काय करायला हवे याच्या अतिशय महत्वाच्या टिप्स ग्रामीण ढंगात देवून सर्वाना पोट धरून हसायला लावले. मला कामाची हौस आहे,मात्र विरोधक काम करू देत नाहीत. ग्रामसेवक ऐकत नाही. अशा कोणत्याही तक्रारी करीत बसू नका. हा काटेरी रस्ता आहे. आता निर्धाराने पार करावा लागेल. जगात तुम्हाला किती अक्कल आहे,यापेक्षा तुम्ही अक्कल नसणाऱ्यांना कसे सामावून घेता? यावर तुमचे यश अवलंबून आहे. महिलांच्यासह सर्व घटकांना विकासात सामील करा. ग्रामपंचायत उत्पन्न वाढवा,तसेच शाळा,अंगणवाड्या कडे लक्ष द्या.

Rate Card

          प्रारंभी उद्योगपती सर्जेराव यादव यांनी आ.पाटील यांच्यासह मान्यवरांचे रोप देवून स्वागत केले. याप्रसंगी माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील,गटविकास अधिकारी राहुल गावडे, विजयबापू पाटील,बाळासाहेब पाटील,संग्राम पाटील, संजय पाटील,विठ्ठलराव पाटील, राजन महाडीक, जे.डी.मोरे यांच्यासह सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोपाळ पाटसुपे यांनी सूत्र संचालन केले. प्रा.दत्ता पाटील यांनी आभार मानले.

निवडणुकीचा खर्च

         आ.पाटील यांनी,आपण सर्वजण सरळ मार्गानेच निवडून आला असाल,असे म्हणताच एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले,त्यातून कोणाचा जादा खर्च झाला असेल,तरी गावाच्या विकासाला तोषिस लावू नका. गावातील कामे दर्जेदारच व्हायला हवीत.

फोटो ओळी- इस्लामपूर येथे ‘चला, गाव घडवूया’या एक दिवशीय ग्राम परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील. व्यासपीठावर सर्जेराव यादव,भास्करराव पेरे-पाटील,सचिन हुलवान व मान्यवर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.