जत,प्रतिनिधी :जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे सक्त आदेश अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले आहेत.त्यानुसार जत तालुक्यातील अनेक फुटक्या रोडचे खड्डे भरण्याचे सोपस्कर पुर्ण केले जात आहे. मात्र खड्डे भरणारे साहित्य पुन्हा दर्जाहीन असल्याचे सिध्द होत आहे. खड्डे भरत पुढे चालेले ठेकेदाराचे कामगार एक -दोन किलोमीटर पुढे जाण़्या अगोदर मागील भरलेले खड्डे उघडे पडत आहेत. त्यामुळे नेमके खड्डे कशासाठी भरले जात आहेत. हा संशोधनाचा विषय बनला आहे.
खड्डे कामातील टक्केवारी, भेसळयुक्त डांबराचे रॅकेट पुन्हा समोर येत आहे. त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त’चा आदेश तात्पुरती मलमपट्टी ठरणार असल्याचे समोर येत आहे.जत शहरासह तालुक्यातील अनेक खड्डेमय रस्ते दुरूस्थीच्या मागणीवरून प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रस्ते आणि खड्ड्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. मात्र, रस्त्यांवरून सुरक्षित, समाधानाचा प्रवास लोकांच्या नशिबी दिसत नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. खड्ड्यांमुळे अनेक बळी गेले आहेत. मात्र त्याबद्दल यंत्रणेला ‘ना खेद ना खंत’, अशी स्थिती आहे. रस्ते कामात टक्केवारी बोकाळली आहे. ठेकेदारांची नफेखोरीही वाढली आहे. त्याचा थेट परिणाम कामाच्या दर्जावर झाला आहे. रस्ते कामासाठी वापरले जाणारे डांबर, खडी, मुरूम आणि रोलिंग हा सारा विषयच वादग्रस्त आहे. कंपनीतून डांबर बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यात भेसळ करणारे रॅकेट कार्यरत आहे. एक टन डांबराचा बाजारभाव 35 हजार रुपयांपर्यंत आहे. डांबरात भेसळ करून पैशाची बचत केली जाते. एवढेच नव्हे तर गरजेच्या 30 ते 40 टक्केच डांबराचा वापर केला जातो. रस्ते डांबरीकरणात डांबर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पण भेसळ आणि डांबराचा कमी वापर यामुळे रस्त्याचा दर्जा घसरला आहे. रस्त्यावर लगेचच पडणारे खड्डे हा त्याचाच परिणाम आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात केलेल रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. काम सुरू असताना लोकांनी केलेल्या तक्रारीला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्थपुर्ण सहयोगाने बगल दिल्यानेच फुटके रस्त्यावरून नागरिकांना ज-ये करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बांधकाम विभाग,लोकप्रतिनिधी,ठेकेदार साखळीवर घाव घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
जत तालुक्यातील रस्त़्यावरील भरलेले खड्डे एका दिवसात उखडले आहेत.





