नाटक : तोच परत आलाय
एखादा प्रसंग अंगावर अचानक आला कि मनाची घालमेल होते, आणि नेमके काय करावे हे सुचत नाही, जी घटना घडली आहे त्याच्या मागे–पुढे काय घडले ह्याचा तपास सुरु होतो आणि तपास सुरु झाला कि रहस्य वाढत जाते आणि रहस्य वाढायला लागले कि गुंतागुंत सुरु होते हे कोणामुळे झालं तर कोणीतरी परत आलाय आणि म्हणून हे सारे घडते,, हाच धागा पकडून ” तोच परत आलाय ” हे नाटक गणरंग आणि महाराष्ट्र रंगभूमी या नाटय संस्थेने सादर केलं आहे. लेखन प्रवीण धोपट यांचे आहे. नाटकाची निर्मिती वैजयंती आपटे यांची असून दिगदर्शन मंगेश सातपुते यांचे लाभले आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केलं असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांनी आहे, अशोक पत्की यांनी दिलेलं संगीत हे परिणाम साधून जाते. या नाटकात संग्राम समेळ, गिरीश परदेशी, शृजा प्रभुदेसाई, रमेश रोकडे, सुनील खंडागळे, समता जाधव–कळंबे,चंद्रकांत पांचाळ, समीर पाठारे या कलाकारांच्या भूमिका आहेत.
डॉ आनंद परांजपे एक प्रतिष्ठित डॉक्टर, त्यांच्या हाताला यश आहे. आणि त्यांचा डॉक्टरकी चा व्यवसाय खूप जोरात सुरु आहे. आपण मिळवलेल्या पैश्यातून एक मोठं हॉस्पिटल बांधले जावे अशी त्यांची इच्छा असून त्या दिशेनं त्यांची पाऊले पडत आहेत, त्यांची पत्नी मानसी ह्या सुविद्ध असून त्यांना रोहन नावाचा एक मुलगा आहे, तो क्लास ला गेलेला असून अजून परत आलेला नाही त्यामुळे मानसीला काळजी लागून राहिलेली असते, त्याचवेळी फोन वाजतो ती फोन उचलते पण पलीकडून कोणीच बोलत नाही, त्यामुळे काळजी वाढत जाते. डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे पुरस्कार मिळालेला असतो,त्याच प्रमाणे ते हॉस्पिटलच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला निघालेले असतानाच एक व्यक्ती घरात शिरते आणि कि माझी एक वस्तू आपणाकडे आहे ती वस्तू मला परत द्या किंवा पांच लाख रुपये द्या, त्या व्यक्ती चे नांव असते रोहिदास सदाशिव भोसले, डॉक्टर आणि रोहिदास चे संभाषण सुरु असताना मानसी तेथे येते त्यावेळी रोहिदास डॉक्टरांना विचारतो कि रोहन आपलाच मुलगा आहे का ? मानसीला पुन्हा धक्का बसतो, त्याचवेळी फोन वाजतो, तो फोन डॉ मेहता यांचा असतो डॉ आनंद परांजपे त्यांच्याशी बोलतात पण मानसीच्या मनातून चिंता काही जात नाही.
कालांतराने तोच रोहिदास पुन्हा परत डॉक्टरांच्या कडे येतो आणि काही गोष्टींचा खुलासा करीत दहा लाखाची मागणी करतो, डॉक्टर सारे अमान्य करतात, त्याचवेळी तिथे विठ्ठल सोनावणे आणि सुशीला सोनावणे येतात आणि ते सुद्धा रोहन माझा मुलगा आहे असे सांगून तो मुलगा परत हवा आहे असे सांगतात. मानसीच्या समोर सारे घडते, रोहन सुद्धा घरी आलेला नसतो, त्याला कोणी पळवून नेला आहे असे वाटून पोलीस तपास सुरु होतो. मानसीला प्रश्न पडलेला आहे कि आपला मुलगा रोहन ह्याला हि मंडळी का मागतात ? विठ्ठल सोनावणे आणि सुशीला सोनावणे यांचा ह्या मुलाशी काय संबंध ? रोहिदास सदाशिव भोसले सातत्याने डॉ आनंद परांजपे याना कश्यासाठी भेटत असतो ? अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे ह्या नाटकात मिळतील ?
डॉ आनंद परांजपे ची भूमिका गिरीश परदेशी यांनी साकारली असून त्याने डॉक्टरीपेशा मधील बारकावे अत्यंत संयमाने साकारले आहेत, मानसी परांजपे ची भूमिका शृजा प्रभुदेसाई यांनी विलक्षण ताकदीनं रंगवली आहे, सुखदुःखाच्या छटा त्यांनी रंगविल्या आहेत. रोहिदास सदाशिव भोसले ची व्यक्तिरेखा संग्राम समेळ यांनी आत्मविश्वासाने त्यातील बारीक–सारीक बारकाव्यांसह पेश केली आहे. याशिवाय सुनील खंडागळे, रमेश रोकडे, समता जाधव–कळंबे, चंद्रकांत पांचाळ, समीर पाठारे, यांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.
आजकालच्या डॉक्टरी पेशा मध्ये आयव्हीएफ हे वैद्यकीय तंत्र विकसीत झाले असून त्याचे फायदे आहेत पण त्याचा गैरफायदा – गैरवापर केला जातो ह्यावर भाष्य करणारे हे नाटक आहे. नाटकात एक मुलगा आणि त्याच्यावर हक्क सांगणारे तिघेजण हि एक विलक्षण गुंतागुंत असून त्या मधील रहस्याची उकल ह्या नाटकात केली आहे. उत्कंठा वाढवून परिणाम साधणारे हे नाटक आहे.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७





