चित्रपट ” द सायलेन्स ” गंभीर विषयाला वाचा फोडणारा ,,,
आज समाजात विविध वयोगटातील लहान मुलींपासून मोठ्या महिलांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत, तरी त्या काही बोलू शकत नाहीत, त्याचप्रमाणे घरेलू हिंसाचार, कार्यस्थळी लैंगिक छळ इत्यादी ठिकाणी अश्या घटनांवर भाष्य करणारा द सायलेन्स हा सिनेमा असून त्याची निर्मिती एस एम आर प्रॉडक्शन आणि ३६१ डिग्री एंटरटेनमेंट तसेच मीडिया प्रा. ली. ह्या चित्रपट संस्थेतर्फे नवनीत हुल्लड मोरादाबादी, अरुण त्यागी, अश्विनी सिडवानी, अर्पण भुखनवाला असून सहनिर्माते गिरीश पाठारे, सनी खन्ना हे आहेत. सिनेमाची कथा अश्विनी सिदवानी यांची असून पटकथा – संवाद आणि दिगदर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. संगीत इंडियन ओशन यांचे आहे, ह्या मध्ये नागराज मंजुळे, अंजली पाटील, कादंबरी कदम, रघुवीर यादव, मुग्धा चाफेकर, वेदश्री महाजन यांच्या भूमिका असून ह्यामधील भूमिकेला त्यांनी संपूर्ण न्याय दिलेला आहे.
लोकल ट्रेन मध्ये एका रात्री चिनी नावाची तरुण मुलगी प्रवास करीत असते त्याचवेळी शेजारच्या डब्यामधून ओरडण्याचा आवाज तिच्या कानी पडतो ती आणि तिला एक विचित्र दृश्य दिसते एक माणूस एका तरुण मुलीवर बलात्कार करीत असतो, चिनी ला आपले बालपण आठवते,
चिनी हि अत्यंत गरीब घरात जन्म झालेली मुलगी ती आपल्या वडिलांच्या बरोबर एका खेडेगावात रहात असते, ती मोठी होते, वयात येते त्यावेळी तिचे वडील तिला तिच्या मामा-मामी कडे पाठवतात, मामा तिला आपल्या घरी घेऊन येतो तिचे लाड करतो, आणि एक दिवस अशी घटना घडते कि चिनी हि अत्यंत अस्वस्थ होते, कोणाशीच ती बोलत नाही, मामा तिला तिच्या गावी पोहोचवून येतो, चिनी ला एक बहीण असते ती शहरात एक्स्ट्रा अभिनेत्री चे काम करीत असते, चिनी घरी येते त्यादिवसापासून ती कोणाशीच बोलत नाही, एकटीच गप्प-गप्प असते, शेवटी तिच्या वडिलांना खरा प्रकार कळतो, मामाने त्या चिनीवर बलात्कार केलेला असतो, पण त्याच्या विरुद्ध पुरावा नसल्याने त्याला कोणी काहीच करू शकत नाही,
मामा हा आपल्या बायकोवर सुद्धा अत्याचार करीत असतो, ती मुकाटपणे सारे सहन करीत असते, ह्या दोन घटना आहेत त्याप्रमाणे तिसरी एक घटना आहे, एका गरीब बाईच्या घरातील धान्य संपते ती मामाच्या कोठारात जाऊन धान्य चोरी करते, मामा तिला पकडतो आणि तिच्यावर अत्याचार करतो, अश्या ह्या घटना समाजातील ” प्रातिनिधिक ” स्वरूपातील घटना असून त्या ह्या सिनेमात गुंफल्या आहेत. ह्या सर्व अत्याचार पीडित महिला विविध वयाच्या असून त्या गप्प बसतात, त्या सायलेन्स होतात, मानसिक दडपणामुळे त्या बोलू शकत नाहीत.
समाजात लैंगिक छळ विषयीच्या घटना घडत आहेत, त्याविषयी कडक कायदे केले आहेत तरी अश्या घटना घडण्याचे थांबत नाही, ह्यावर हा सिनेमा भाष्य करतो, ज्या मुलीवर अन्याय होतो, अत्याचार होतो तिला पुराव्या अभावी न्याय मिळत नाही, मुलींना पुस्तकी शिक्षण देताना परिस्थितीचे / वास्तवाचे सुद्धा शिक्षण दिले गेलं पाहिजे,
नागराज मंजुळे ह्यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला असून त्याच बरोबर अंजली पाटील सुद्धा लक्षांत रहातात, कादंबरी कदम, रघुवीर ;यादव, मुग्धा चाफेकर, बालकलाकार वेदश्री महाजन ह्यांनी आपल्या भूमिका छान सादर केल्या आहेत, गजेंद्र अहिरे यांचे दिगदर्शन असून योग्य तो संदेश त्यांनी पोहोचवला आहे.सिनेमाचे संगीत हे परिणाम साधून जाते. वास्तव समाजाचे यथार्थ चित्रण ह्या सिनेमात पाहायला मिळेल, सिनेमाचे नाव जरी सायलेन्स असले तरी त्याने अनेक गोष्टी बोलक्या केल्या आहेत. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला / अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे असा संदेश हा सिनेमा देतो.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७