शेतकऱ्यांसाठी स्वतः रस्त्यावर उतरणार– शरद पवार दिवाळीपर्यंत कर्जमाफी न झाल्यास शेतकरी असहकार पुकारतील

0

शेतकऱ्यांसाठी स्वतः रस्त्यावर उतरणार– शरद पवार



दिवाळीपर्यंत कर्जमाफी न झाल्यास शेतकरी असहकार पुकारतील




Rate Card



मुंबई. ( शाहरुख मुलाणी ); राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी आणि बुलेट ट्रेन या विषयांवर भाष्य केले. राज्य सरकारने दिवाळीपर्यंत कर्जमाफी देऊ असा शब्द दिला होता. तसे न झाल्यास ५ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे शेती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन असहकार आंदोलन पुकारू, असा इशारा पवार यांनी दिला. कर्जमाफीच्या निर्णयात वापरलेला ‘सरसकट’ शब्द आम्हाला महत्त्वाचा वाटतो. त्याबाबत तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना पवार म्हणाले की राष्ट्रवादी किसान मंचचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानातंर्गत राज्यभर दौरे केले आहेत. कालच्या बैठकीत दिवाळीपर्यंत कर्जमाफी न झाल्यास असहकाराचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती केल्यामुळे शेतकऱ्यांना २०० ते ५०० रु. खर्च करावे लागत आहेत. कर्जमाफीचा पत्ता नाही पण फॉर्म भरण्यातच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दीड लाखांवर कर्ज असलेल्यांना दिलेला वन टाईम सेटलमेंटचा पर्याय योग्य नाही. सहा लाख कर्ज असणारा शेतकरी साडे चार लाख कर्ज फेडू शकला असता तर तो थकबाकीदार झाला असता का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. लोकशाहीच्या चौकटीत राहून सबंध राज्यभर संघर्ष सुरु करावा, असा मतप्रवाह राज्यभरात सुरु आहे. या संघर्षात मी स्वतः शेतकऱ्यांसोबत उतरणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची राज्यव्यापी बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेते पवार यांनी बैठकीतील निर्णय जाहीर केले. कर्जमाफीच्या विषयासोबतच महागाईच्या प्रश्नावर देखील संघर्षाची भूमिका घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याचे पवार यांनी सांगितले. देशातील मोठ्या कंपन्यात नोकरकपात सुरू झाली असल्याची बातमी आज इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात आली आहे. एल अँड टी सारख्या बलाढ्य कंपन्याही नोकरकपात करत असल्याचे सांगत पवार यांनी या बातमीतील आकडेवारी वाचून दाखवली. नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. गुंतवणुकीचे वातावरण खराब झाल्यामुळे नवी गुंतवणूक येत नाही. मेक इन इंडिया सारखे स्लोगन देऊन अनेक उपक्रम चालू केले गेले. पण या स्लोगनचे परिणाम आता लोकांना भोगावे लागत असल्याची टीका पवार यांनी केली.

बुलेट ट्रेनसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना पवार म्हणाले की आम्ही तंत्रज्ञानाला कधीच विरोध केला नाही. पण तंत्रज्ञान लोकांना उपयोगी पडेल असे असावे. काही वर्षांपूर्वी लोकल ट्रेनने प्रवास करणार्‍या लोकांसाठी नवीन प्रकल्प देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले होते. त्याची अमलबजावणी झाली असती तर एल्फिन्स्टन येथे झालेली दुर्घटना टाळता आली असती आणि अनेकांचे प्राण वाचले असते, अशी शक्यता पवार यांनी व्यक्त केली. तसेच बुलेट ट्रेन ही फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे, असे भाषण नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याची विडियो क्लिपही पत्रकार परिषदेत आ. जितेंद्र आव्हाड यांनी दाखवली. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा विस्तार महाराष्ट्रात फक्त २५ टक्के इतकाच आहे. तब्बल चार स्थानकाचा प्रवास फक्त ३५ मिनिटांचा आहे. पुढे गुजरातमध्ये तो दोन तासांचा आहे. तरीही महाराष्ट्र या प्रकल्पाचा अर्धा खर्च का उचलत आहे? राज्याला बुलेट ट्रेन लाभदायक नाही. त्यापेक्षा मुंबईतील लोकल प्रवास सुखकर होण्यासाठी सरकारने खर्च केला पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली. सोशल मिडीयासंदर्भात भाजप आता आक्रस्ताळी भूमिका घेताना दिसत असल्याचा टोला पवार यांनी भाजपला लगावला. २०१४ साली भाजपने सोशल मिडियाचा वापर करुन सत्ता प्राप्त केली. आज सरकारची धोरणे चुकल्यामुळे हाच सोशल मिडीया भाजपच्या विरोधात गेला आहे. जे लोक भाजपच्या धोरणांवर टीका करत आहेत, अशा युवकांना नोटीसा पाठवून धमकवण्याचे काम सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याची टीका पवार यांनी केली. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये, असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.