जत नगरपरिषदेचा‌ भोगळ कारभार चव्हाट्यावर | कामांचा दर्जा सोडा,दिशाही भरकटली | कोट्यावधीचा निधी फस्त

0

जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेकडून शहरात कोट्यवधी रुपये विकासकामांच्या नावावर खर्ची घालण्यात आले; परंतु कामाचा दर्जा तर सोडा दिशाही भरकटली आहे. नियोजनाच्या अभावामुळे शहर भकास हाेण्याच्या मार्गावर असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जत नगरपरिषदेच्या पहिल्या,दुसऱ्या वेळी सत्ता मिळाली. सुवर्णयोग म्हणजे स्थानिक आमदार कॉग्रेसचे आणि राज्यात सत्ताही महाआघाडीची होती. त्यामुळे भरघोस निधीही मिळाला; परंतु खर्च झालेल्या निधीतून अपेक्षित आणि दर्जात्मक कामे झाली नाही. शहरातील वस्त्या अजूनही विकासापासून कोसो दूर आहेत. पावसाळ्यात तर नगरपालिकेने केलेली ‘विकासकामे’ उघड्यावर पडतात. परिसर स्वच्छतेच्या बाबतीतही लोकांची नाराजी आहे. नियोजनाअभावी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्तारुढ पक्ष सपशेल अपयशी ठरल्याचे नागरिकांतूनच बोलले जात आहे. अनेक ले-आऊटमध्ये पक्के रस्ते तर सोडा सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याही नाहीत. त्यामुळे नगरसेवकांकडून शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला आहे

बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर

मागील काही महिन्यांत अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. काही कामे अजूनही सुरू आहेत. त्यातील अनेक कामांचा दर्जा राखता आलेला नाही. आतापासूनच सिमेंट रस्ते उखडायला लागले आहे. नाल्यांची उपयोगिता ‘उघड्यावर’ पडली आहे.

अतिक्रमण मूळ समस्या

शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली जात आहेत. एवढेच नाही तर मुख्य रस्तेही अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे गरजेचे आहे.

अनेक भागाला येते तळ्याचे स्वरूप

नियोजनशून्य आणि दर्जाहिन कामांमुळे सुविधेऐवजी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.अनेक रोडच्या कडेना गटारी नसल्यामुळे थोडे जरी पाणी आले, की थेट घरात शिरते. त्यामुळे लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान होते.काही रोड व इतर भागाला तळ्याचे स्वरुप येते. या मूलभूत समस्या सोडविण्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.

चिखलमय रस्त्यांमुळे असुविधा

चिखलमय रस्ते आणि नाल्यांअभावी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ले-आऊटला मान्यता देण्यापूर्वी सर्व संबंधित विभागाकडून संपूर्ण आवश्यक सुविधा का करून घेतल्या जात नाही, असा प्रश्न यानिमित्तान उपस्थित होतो. आर्थिक देवाणघेवाणीतून हे सर्व प्रकार केल्या जात असल्याची उघड चर्चा आहे

अधिकारी लोकप्रतिनिधींचा मिलीभगत

शहरात कोट्यावधी रुपयांची कामे झाली. निकृष्ट कामांविषयी अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या परंतु संबंधितांंकडून त्याची दखल घेतली गेली नाही. लोकप्रतिनिधींनी दर्जात्मक विकासकामे व्हावी, यासाठी वेळ आणि शक्ती खर्ची घातली, असे कधी दिसून आले नाही. त्यामुळे या कामांना अधिकारी व लोकप्रतिनिधींची मिलीभगत कारणीभूत असल्याचे दिसते.

शहराला नळयोजनेची प्रतीक्षा

उन्हाळ्यामध्ये शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.25-30 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या नळयोजनेतूनच आजही पाणीपुरवठा केला जातो. जीर्ण व जागोजागी फुटलेल्या नळांतून दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाण्याची समस्या सोडविण्याची ‘हिंमत’ आणि महत्त्वाकांक्षा अजूनपर्यंत एकाही लोकप्रतिनिधींमध्ये दिसून आली नाही.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.