भूमिअभिलेख’च्या फायलींवरील धूळ हटेना | अधिकारी गायब ; एक महिला कर्मचारी चालविते मनमानी कारभार

0
Rate Card
जत : शेतजमीन, जागा यांची मोजणी करणारे, अशा मालमत्तेच्या नोंदी जतन करणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार ‘हायटेक’ झाला असला तरी येथील कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीदेखील मोठी कमतरता आहे. त्यामुळे येथील फायलींवरील धूळ महिनोंमहिने झटकली जात नसल्याने हे कार्यालय नागरिकांसाठी ‘दाद न फिर्याद’ असाच कटू अनुभव देणारे ठरत आहे.येथे नेमलेला अधिकारी कार्यालयाकडे फिरकत‌ नसल्याने अनेक दिवसापासून तळ ठोकलेली एक महिला कर्मचारी ‌कारभार पाहत असून त्यांच्याकडून नागरिकांची हेळसाड‌ होत असल्याचे आरोप आहेत.
खासगी जमीन, मोकळ्या जागा, इमारती यांच्या क्षेत्रफळाची इत्थंभूत माहिती जतन करण्याचे काम भूमिअभिलेख कार्यालयामार्फत पार पाडले जाते. राज्याच्या जमावबंदी आयुक्तालयाच्या अखत्यारित चालणाऱ्या या विभागात मालमत्तेच्या नोंदी जतन केल्या जातात. त्या तंतोतंत तर असतात, शिवाय त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रमाण मानले जाते.

यामुळे जमीन मोजणी, पुनर्मोजणी, एकत्रीकरण, मिळकतीच्या नोंदी व त्यांच्या सनदा, फेरफार अशी विविध कामे पार पाडणारा हा विभाग म्हणजे अनेकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. शेजाऱ्यांशी असलेले वाद, भाऊबंदकीतून आपसात निर्माण झालेले तंटे, सीमांकनाचे मुद्दे यासाठी ‘योग्य अयोग्य’ ठरविण्यात कायदेशीर व महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयात वेळेवर प्रकरण निकाली निघत नसल्यामुळे अनेक प्रकरणे ‘मुद्द्यावरून गुद्द्यावर’ जात आहेत.

मोजणीसाठी मोठी रक्कम जमा करूनही मोजणी होत नाही, झाली तर त्यांच्या खुणा वेळेवर करून दिल्या जात नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारीचा सूर आळविला जात असला तरी कोणी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत आहे ना कोणी वरिष्ठ अधिकारी. यामुळे अनेक नागरिकांना आपल्या कामासाठी अकारण कार्यालयात हेलपाटे तर मारावे लागत आहेतच, शिवाय कामे वेळेत होत नसल्याने मूळ समस्या निकाली निघत नसल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या खुर्च्या रिकाम्या,

भूमिअभिलेख कार्यालयाचा संपूर्ण भार उपअधीक्षक या पदावर असतो. परंतु, मागच्या वर्षभरापासून येथील हे पद रिक्त असल्याने येथे ‘प्रभारीराज’ सुरू आहे. विशेष म्हणजे, येथील पदभार असलेल्या अधिकाऱ्यांकडे असाच अन्य दोन, तीन तालुक्यांचादेखील भार आहे. यामुळे त्यांचा वेळ ‘अमूल्य’ झाला आहे. यानंतर दुसरे महत्त्वाचे अनेक महत्वाची पदेही रिक्तच असल्याने मुख्यालयातील संपूर्ण ‘शिरस्ता’ बिघडला आहे. 

कसली आणली शीघ्र मोजणी ?

विविध गावांत शेतजमिनीच्या हद्दीचे, विहित क्षेत्राचे वाद प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांना रीतसर मोजणी करून घेऊन, आपसात वाद मिटविण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात जमीन मोजणीसाठी केली जाणारी शुल्क आकारणी भरणा केली आहे. यास अनेक महिने लोटले तरी प्रत्यक्षात मात्र ना मोजणी होतेय ना त्यांच्या खुणा करून दिल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, कोरोना अशी विविध कारणे देत मोजणीस विलंब लागत असल्याने शीघ्र मोजणीसाठी पैसै भरलेल्या शेतकऱ्यांवर स्वतःचे हेलपाटे मोजण्याची वेळ आली आहे.

हा कसला हायटेक कारभार…

भूमिअभिलेख कार्यालयातील कारभार सुलभ, पारदर्शक व गतीने व्हावा यासाठी विविध संगणकीय प्रणाली वापरात आणल्या आहेत. भूमिअभिलेखाचे ‘आधुनिकीकरण’ मार्गी लावले आहे. जुन्या साधनांच्या मोजणीच्या जागी आता अत्याधुनिक अशी ‘ईटीएस’ मशीन वापरात आली आहे. याशिवाय ई-मोजणी, ई-नकाशा, ई-अभिलेख, ई-पुनर्मोजणी, ई-भूलेख अशा विविध ‘हायटेक’ सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. असे असले तरी मागच्या काही वर्षातील जत येथील भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार मात्र ‘खातं’ बरं होत, असे म्हणण्याची वेळ गावगाड्यातील लोकांवर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.