वाळेखिंडीत ४० वर्षाचा वाद मिटला
जत : वादाने वाद वाढता, पिढी संपते पण वाद संपत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण आजच्या युवा पिढीने पुढाकार घेत सामोपचाराने तोडगा काढला, त्याला गावातील पंचाची प्रामाणिक साथ मिळाली तर वाद तर जागेवर मिटतोच. त्याचबरोबर दुरावलेली कुटुंबे, माणसे, त्यांची मने कधी जुळून येतात हे ही कळत नाही. एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे हात एकमेकांना पेढे भरवत असल्याचे दृश्य पाहून जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा आपसूक ओल्या झाल्या. ४० वर्षाचा वाद मिटला याचा आनंद ‘त्या’ दोन्ही कुटूबियांना झाला.वादातील तीन एकर जमीन जागेवर ताब्यात दिली ; वाळेखिंडी येथील विष्णू शिंदे व विठ्ठल कोडग यांच्यात जमिनीवरून ४० वर्षांपासून टोकाचा वाद सुरू होता.
वाद टाळत विष्णू शिंदे यांनी विठ्ठल कोडग यांना तीन एकर जमीन त्यांच्या ताब्यात पंचासमक्ष जागेवरच ताब्यात दिली.आज जिथे फूट,दोन फूट रस्त्यासाठी एकमेकांची,भावभावकीची डोकी फोडली जातात तेथे विष्णू शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेला समजूतदारपणा निश्चितच कौतुकास्पद आहे.माजी सभापती शिवाजी शिंदे,माजी संरपच संभाजी शिंदे,माजी चेअरमन तानाजी शिंदे,विलास शिंदे,महादेव शिंदे,प्रविण पाटील,बबन शिंदे,सतीश शिंदे,आदींनी यात पुढाकार घेतला.