तासगाव कारखान्याच्या अकाउंट, शेती विभागास ठोकले कुलूप | ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक : सोमवारी चेक देण्याचे आश्वासन

0
तासगाव : सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्यांची कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत.गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून ही बिले मिळावीत, या मागणीसाठी शेतकरी विविध मार्गाने प्रयत्न करीत आहेत. आंदोलने, मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी रस्त्यावर उतरले. मात्र आजतागायत अनेक शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज तासगाव कारखान्याच्या अकाउंट व शेती विभागास कुलूप ठोकले. दरम्यान, कारखाना प्रशासनाकडून सोमवारी ऊस बिलाचे चेक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी कारखानास्थळावरून परत गेले.
      तासगाव आणि नागेवाडी हे दोन्ही कारखाने खासदार संजय पाटील चालवतात. या कारखान्यांचे धुराडे पेटवताना खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांना ऊस घालण्याचे आवाहन केले होते. शिवाय चांगला दर देण्याचीही ग्वाही दिली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी खासदार पाटील यांच्यावर विश्वास ठेवून या कारखान्यांना ऊस पाठवला. मात्र गेल्या आठ – नऊ महिन्यात हजारो शेतकऱ्यांना एक दिमडीही उसाचे बिल मिळाले नाही.
       त्यामुळे गेल्या काही महिन्यात खासदार पाटील यांच्याविरोधात ऊस बिले मिळावीत, या मागणीसाठी विविध संघटनांनी अनेक आंदोलने केली आहेत. मोर्चा, ठिय्या, भीक मांगो आंदोलन करून शेतकऱ्यांनी संजय पाटील यांना धारेवर धरले आहे. आंदोलनांच्या वाढत्या धगीनंतर मध्यंतरी 20 ते 22 कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत. मात्र आजही हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ऊस बिले कारखान्याकडे अडकली आहेत.
Rate Card
      ही थकीत बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी शेतकरी कारखान्याकडे सातत्याने हेलपाटे मारत आहेत. मात्र कारखाना प्रशासन, खासदार संजय पाटील शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या विसापूर, खंबाळे, आळसंद, बोरगाव या भागातील शेकडो शेतकरी आज (शुक्रवारी) कारखान्यावर जमले. त्याठिकाणी शेती व अकाउंट विभागात असणाऱ्या कारखाना प्रशासनाला बिले कधी मिळणार, असा जाब विचारला. त्यावेळी तेथील काही अधिकाऱ्यांनी 10 तारखेला बिले मिळतील, असे सांगितले. यावर शेतकऱ्यांनी 10 तारखेचे चेक द्या, अशी मागणी केली. त्यानंतर चेक पाहिजे असतील तर ते 30 ऑक्टोबरचे मिळतील, अशी भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली. यातूनच शेतकरी व कारखाना प्रशासनामध्ये वादावादी झाली. यावेळी काहींनी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांना फोन लावून त्यांनी कारखान्यावर यावे, अशी मागणी केली. मात्र, आर. डी. पाटील यांनी आज येऊ शकत नसल्याचे सांगितले.
      त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेती आणि अकाउंट विभागातील अधिकाऱ्यांना बाहेर काढून या दोन्ही विभागांना कुलूप ठोकले. जोपर्यंत ऊस बिले मिळणार नाहीत तोपर्यंत कारखान्याचा कोणताही विभाग चालू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
     शेतकऱ्यांचे रौद्र रुप पाहून कारखाना प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. अखेर सोमवारी ऊस बिलाचे चेक देण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी ठोकलेले कुलूप काढण्यात आले. दरम्यान, जर सोमवारी ऊस बिलाचे चेक मिळाले नाहीत तर पुन्हा कारखान्यास कुलूप ठोकू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
      यावेळी नामदेव माने, अजय माने, भीमराव माने, प्रताप माने, हरिभाऊ माने, महेश पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.