जत,संकेत टाइम्स : सोनलगी (ता.जत, जि. सांगली) येथे बोर नदीच्या काठावर कपडे धुण्यास गेलेल्या सोनाली तुकाराम कांबळे (वय २६) या अंपग महिलेचा अखेर सोळा तासानंतर मृत्तदेह सापडला आहे.त्यांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटना सोमवारी घडली होती.मृतदेहाचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक,उमदी पोलीस व सांगलीच्या बचाव पथकाने प्रयत्न केला.मंगळवारी सकाळी ७ वाजता बोर नदीच्या काठावर मृतदेह तरंगताना आढळून आला.
अधिक माहिती अशी, घटस्थापना व दसरा सणाच्या निमित्ताने घरातील स्वच्छता मोहीम ही प्रत्येक घराघरात सुरू आहे.सोनाली या सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरातील कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.कपडे धुताना त्या पाय घसरून पाण्यात पडल्या होत्या. गावात ही बातमी कळताच नदी पात्रात रात्री उशिरापर्यत शोधशोधा सुरू होती. मात्र त्या सापडल्या नाहीत. शोध मोहीम सुरू असताना उमदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.सांगली वरून बचाव पथक बोलावण्यात आले होते.
मात्र ते रात्री उशिरापर्यंत पोहचले नव्हते.तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध घेण्यास अडचणी निर्माण येत होत्या.अखेर मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृतदेह सापडला.जत येथे मृत्तदेहाचे शवविच्छेदन करून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाली यांचे पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.त्या स्व:ता दोन्ही पायांनी अपंग होत्या.त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे.सोनाली मोलमजुरी करून कुंटुब चालवत होत्या.त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली आहेत.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.