जतच्या डफळे घराण्याशी सुमारे चारशे वर्षाच्या पराक्रमाचा इतिहास जोडलेला आहे.राजस्थानमधील पराक्रमी दुधात हाडा चौहान राजपूत वंशाबरोबर जतच्या डफळे घराण्याचा इतिहास निगडित आहे.डफळे घराण्याला सर्जनसिंह, शामलसिंह, शार्दूलसिंह, सटवाजी अशा पराक्रमी पुरुषांची परंपरा या घराण्याला आहे.
उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्याची एक स्वतंत्र गादी आहे.डफळे घराण्याचे संस्थापक श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते.श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सुनबाई राणी येसूबाई यांनी 1707 ते 1738 सालापर्यंत डफळे संस्थानाचा राज्यकारभार एकहाती सांभाळला.
1738 साली राणी येसूबाई यांनी आपले सावत्रदीर खानाजीराव यांच्या चारही मुलांना दत्तक घेतले.दत्तकानंतर यशवंतराव, रामराव,भगवंतराव व मुकुंदराव हे डफळे संस्थानाचे वारस झाले.या चारही मुलांना राणी येसूबाई यांनी आपली जहागिरी वाटून दिली.थोरले यशवंतराव यांना जत,दुसरे रामराव यांना डफळापूर,तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वात लहान असलेले मुकुंदराव यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात असलेल्या हुलजंतीची जहागिरी दिली.
पूर्वीच्या जत संस्थानातील पण नंतरच्या हुलजंती संस्थानातील अर्थात आताच्या मंगळवेढा तालुक्यातील “लोणार”या गांवात प्राचीनकाळी जमिनीतून मीठ काढण्याची पद्धत होती.”लोणार”या गांवाचा तशा खनिज मिठासंदर्भात अभ्यासकांनी प्राचीन शिलालेखात उल्लेख केलेला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या “इतिहासाची सुवर्णपाने”या पुस्तकात केलेला आहे.
माडगीहाळ किंवा मडीहाळ(आज माडग्याळ ता.जत)येथील महादेव मंदिरातील शिलालेखही (27 जानेवारी 1172,नंदन संवत्सर शके 1093) प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतो.या ठिकाणी माडग्याळचा मालिंगे असा उल्लेख आहे,याशिवाय वासुबिंगे(वासुंबे ता.तासगांव)लोणार ता.जत आणि कोळनूर या गांवाचा उल्लेख आहे.पण “लोणार”या पूर्वीच्या जत संस्थानातील गांवात 12 व्या शतकात खनिजमातीपासून मीठ काढले जात होते,असा शिलालेखात उल्लेख आहे.
लेखक : मच्छिंद्र ऐनापुरे, जत